वाराणसीतील फर्स्ट टाईम वोटर्सना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 10:55 AM2024-05-30T10:55:18+5:302024-05-30T11:28:31+5:30
Narendra Modi : हे पत्र वाराणसी लोकसभा मतदारसंघातील पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना लिहिले आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. तर निवडणूक प्रचाराची ३० मे म्हणजेच आज ही शेवटची तारीख आहे. निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. सातव्या टप्प्यात ८ राज्यांतील ५७ जागांवर मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीवाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना (फर्स्ट टाईम वोटर्स) पत्र लिहिलं आहे. दरम्यान, हे पत्र वाराणसी लोकसभा मतदारसंघातील पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना लिहिले आहे.
१ जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मतदान करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना पत्राद्वारे केले आहे. भाजपाचे कार्यकर्ते वाराणसी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्र मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. दरम्यान, वाराणसी लोकसभा जागेवर पहिल्यांदाच मतदान करणारे ३१,५३८ मतदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना लिहिलेल्या पत्रात, "भारताचे पंतप्रधान आणि तुमचे खासदार म्हणून तुमचे अभिनंदन. आज मी तुम्हाला पूर्ण अभिमानाने आणि आत्मविश्वासाने हे पत्र लिहित आहे."
पुढे नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, "तुम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच तुमचा मताधिकार वापरणार आहात. लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची ही संधी म्हणजे राष्ट्र उभारणीत तुमचा सहभाग पाहण्याचा विशेषाधिकार आहे. लोकशाही हा केवळ शासनाचा एक प्रकार नाही तर आपल्या स्वातंत्र्याचा आधारस्तंभ देखील आहे. वाराणसीने गेल्या २० वर्षात विकासाच्या नवीन शिखरांना कसे स्पर्श केले याचे तुम्ही साक्षीदार आहात." दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला जात आहेत. याठिकाणी ते विवेकानंद रॉक येथे ४५ तास ध्यानधारणा करणार आहेत.