मोदींची नौका बुडतेय, संघानेही सोडली साथ, मायावतींचा भाजपावर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 11:19 AM2019-05-14T11:19:47+5:302019-05-14T11:20:40+5:30
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी बसपाप्रमुख मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी बसपाप्रमुख मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे. पराभव समोर दिसत असल्याने संघानेही भाजपाची साथ सोडली आहे, असा टोला मायावती यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपाला लगावला आहे.
बसपाप्रमुख मायावती आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी आणि भाजपामध्ये उत्तर प्रदेशात क़वी झुंज सुरू आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी बसपाप्रमुख मायावती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वाकयुद्धही तीव्र झाले आहे. दरम्यान, आज मायावती यांनी मोदींवर पुन्हा एकदा टीका केली. ''सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे. पराभव समोर दिसत असल्याने संघानेही भाजपाची साथ सोडली आहे, असे मायावतींनी म्हटले आहे.
BSP Chief Mayawati: PM Modi's government is losing this election, it appears that even RSS has stopped supporting them. In view of unfulfilled election promises & the public agitation, their swayamsevaks are not being seen putting in the work, it has made Shri Modi nervous. pic.twitter.com/u5EFsCITDD
— ANI UP (@ANINewsUP) May 14, 2019
दरम्यान, राजस्थानातील अल्वर येथे दलित महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे राजकारण करीत असल्याबद्दल बसपच्या प्रमुख मायावती यांनी पंतप्रधानांवर कडाडून टीका केली होती. मोदी दलितांविषयी दाखवत असलेला कळवळा व प्रेम नाटकी असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.
राजस्थानमध्ये निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याचे कारण दाखवून या पीडित महिलेची तक्रार नोंदवण्यात पोलिसांनी दिरंगाई केली असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यामुळे सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना लगेच निलंबित केले. मात्र राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर मोदी यांनी प्रचारसभेत टीका केली. मायावती यांनी या सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असेही पंतप्रधान म्हणाले होते.
त्याचा उल्लेख करून मायावती म्हणाल्या होत्या की, अल्वर येथील बलात्कार प्रकरणावरून मोदींनी नक्राश्रू ढाळू नयेत. दलितांविषयी खोटा कळवळा दाखवून मोदी यांच्या हाती काहीही लागणार नाही. दलितांवरील अत्याचारांबद्दल पंतप्रधानांनी मौन बाळगले होते. निवडणूक प्रचारात परिस्थिती पाहून मोदी आपली वेगवेगळी जात सांगतात, असा आरोपही मायावती यांनी केला.