नरेंद्र मोदींच्या पदवीचा आदेश रद्द; अरविंद केजरीवाल यांना २५ हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 07:04 AM2023-04-01T07:04:21+5:302023-04-01T07:05:35+5:30
ही माहिती देण्याचा मुख्य माहिती आयुक्तांचा (सीआयसी) आदेश गुजरात उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी व पदव्युत्तर पदवीची माहिती मागितल्याबद्दल गुजरात उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही माहिती देण्याचा मुख्य माहिती आयुक्तांचा (सीआयसी) आदेश गुजरात उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे.
विद्यापीठाची याचिका
सीआयसीने गुजरात व दिल्ली विद्यापीठाला मोदी यांच्या पदवीची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. या विरोधात गुजरात विद्यापीठाने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देताना न्या. बिरेन वैष्णव यांनी सीआयसीचे निर्देश रद्दबातल ठरविले आहे तसेच पंतप्रधानांच्या पदवीची माहिती मागणारे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर २५ हजार रुपयांचा दंड उच्च न्यायालयाने ठोठावला आहे.
माहिती जाणण्याचा अधिकार नाही काय?
केजरीवाल यांनी ट्विट करून पंतप्रधान किती शिकले, हे जाणून घेण्याचा अधिकार देशाला नाही काय? न्यायालयात पदवी दाखविण्याचा इतका विरोध कशासाठी?
माफी मागा : ठाकूर
पंतप्रधानांच्या शिक्षणावर केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना पुन्हा माफी मागावी लागेल, असे ट्विट केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे.