'लेटर्स टू मदर'; मोदींनी आईला लिहिलेल्या पत्रांवरील पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 08:38 PM2020-05-28T20:38:15+5:302020-05-28T21:04:02+5:30

नरेंद्र मोदींनी तरुणपणात आईला लिहिलेल्या पत्रांवर आधारित पुस्तकाचं पुढील महिन्यात प्रकाशन

pm Narendra Modis Letters to Mother to release in June kkg | 'लेटर्स टू मदर'; मोदींनी आईला लिहिलेल्या पत्रांवरील पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला

'लेटर्स टू मदर'; मोदींनी आईला लिहिलेल्या पत्रांवरील पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला

Next

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तरुणपणी आईला लिहिलेल्या पत्रांवर आधारित पुस्तक पुढील महिन्यात प्रकाशित होणार आहे. या पत्रांमध्ये मोदींनी त्यांच्या आईचा उल्लेख 'जगत जननी' असा केला आहे. मोदी तरुण असताना दररोज रात्री त्यांच्या आईला पत्र लिहायचे. त्यावर आधारलेलं 'लेटर्स टू मदर' नावाचं पुस्तक पुढील महिन्यात हार्पर कॉलिन्सकडून प्रकाशित करण्यात येईल. 

मोदींनी गुजराती भाषेत त्यांच्या आईला लिहिलेल्या पत्रांचं भाषांतर 'लेटर्स टू मदर'मध्ये आहे. भावना सोमय्या यांनी पत्रांचं भाषांतर केलं आहे. मोदींच्या डायरीमधून ही पत्रं घेण्यात आली आहेत. 'लेटर्स टू मदर'मध्ये वाचकांना मोदींनी १९८६ पासून आईला लिहिलेली पत्रं वाचायला मिळतील. 'हा साहित्यिक लिखाणाचा प्रयत्न नाही. या पुस्तकातील परिच्छेद माझ्या निरीक्षणातून निर्माण झालेली प्रतिबिंबं आहेत. माझ्या भावना मी यामधून व्यक्त केल्या आहेत,' अशी भावना मोदींनी या पुस्तकाबद्दल व्यक्त केल्याचं हार्पर कॉलिन्सनं म्हटलं आहे. 

'मी लेखक नाही. आपल्यातले अनेक जण लेखक नसतात. पण प्रत्येक जण भावना व्यक्त करतो. अनेकदा भावना दाटून आल्यावर कागद आणि पेन हाती घेण्याशिवाय पर्याय नसतो. केवळ लिहिण्यासाठी नाही, तर आत्मचिंतनासाठी आपण कागद पेन हाती घेतो. मग डोक्यात आणि मनात चालणाऱ्या गोष्टी कागदावर उतरतात,' असं मोदींनी या पुस्तकाविषयी म्हटलं आहे.

तरुणपणी आईला पत्र लिहिताना मोदी त्यांच्या आईचा उल्लेख 'जगत जननी' असा करायचे. रात्री झोपण्यापूर्वी ते आईला पत्र लिहायचे. यामध्ये विविध विषयांना स्पर्श केलेला असायचा. अनुभवलेलं दु:ख, आनंद, आठवणी ते पत्राच्या माध्यमातून आईला सांगायचे. 

'मोदींनी लिहिलेल्या पत्रांमध्ये तरुणांमध्ये असणारा उत्साह, काहीतरी बदल करण्याची सुरुवात दिसून येते. मात्र काही महिन्यांनी ते पानं फाडून जाळायचे. त्यांच्या १९८६ मधल्या डायरीमधील काही पानं मात्र शिल्लक राहिली. ती पहिल्यांदाच इंग्रजीत वाचकांच्या भेटीला येत आहेत,' असं हार्पर कॉलिन्सनं म्हटलं आहे.

लॉकडाऊनमध्ये वेगळीच खेळी; 'त्या' निर्णयामुळे भरणार मोदी सरकारची झोळी

मोदींच्या भारताकडे कोणी डोळे वटारून पाहू शकत नाही, भाजपाचा राहुल गांधींवर निशाणा

Web Title: pm Narendra Modis Letters to Mother to release in June kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.