Independence Day: मोदींकडून 'चीफ ऑफ डिफेन्स' पदाची घोषणा; तिन्ही दलांचं नेतृत्त्व करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 09:54 AM2019-08-15T09:54:59+5:302019-08-15T09:59:47+5:30
संरक्षण दलांच्या बळकटीसाठी मोदींचा मोठा निर्णय
नवी दिल्ली: लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी घोषणा केली. संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याचं मोदींनी म्हटलं. संरक्षण दलांमध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून सुरू होती. त्याच अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफकडे तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचं काम असेल. सध्या जग वेगानं बदलत आहे. त्यामुळे भारताला तुकड्या तुकड्यांमध्ये विचार करता येणार नाही. आपल्या सैन्य दलांनी एकत्रितपणे पुढे जायला हवं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफमुळे तिन्ही दलांना वरिष्ठ पातळीवर एक प्रभावी नेतृत्व मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सध्या चीफ ऑफ स्टाफ पद अस्तित्वात आहे. चीफ ऑफ स्टाफ कमिटीत तिन्ही दलांच्या प्रमुखांचा समावेश असतो. यातील वरिष्ठ सदस्याकडे समितीचं चेअरमनपद दिलं जातं. चीफ ऑफ डिफेन्स पद निर्माण केलं जावं अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून करण्यात येत होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी हा मोठा निर्णय घेतला.
Our forces are India's pride.
— PMO India (@PMOIndia) August 15, 2019
To further sharpen coordination between the forces, I want to announce a major decision from the Red Fort:
India will have a Chief of Defence Staff- CDS.
This is going to make the forces even more effective: PM @narendramodi
भारताला थेट युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानवर मोदींनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. जगात सध्या असुरक्षेचं वातावरण आहे. जगाच्या कोणत्या ना कोणत्या भागावर चिंतेचं सावट आहे. काही भागातून दहशतवादाला खतपाणी घातलं जात आहे. मात्र भारत अशा शक्तींविरोधात ठामपणे उभा आहे आणि यापुढेही राहील, असा निर्धार मोदींनी व्यक्त केला. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांचा खरा चेहरा आम्ही जगासमोर आणू. दहशतवाद्यांचा खात्माही करू. काहींनी केवळ भारतालाच नव्हे, तर बांग्लादेश, अफगाणिस्तान, श्रीलंकेसारख्या देशातही दहशतवाद पसरवला आहे. या परिस्थितीत भारत शांत राहू शकत नाही. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचा पदार्फाश करण्याचं काम भारत सुरूच ठेवेल, असंही मोदी म्हणाले.