CAA Protest : नाराजी ओढवून घेत देशहितासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, CAAबाबत नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 02:37 PM2019-12-20T14:37:21+5:302019-12-20T15:32:59+5:30
Citizen Amendment Act Protest : दिल्लीतील विज्ञान भवन येथे असोचेमच्या वार्षिक परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सध्या देशभरात तीव्र आंदोलने होत आहेत. मात्र असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्याचा जोरदार बचाव केला आहे. उद्योग जगताशी संबंधित असलेल्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना देशाला संकटातून बाहेर काढण्याची आपली मोहीम कायम राहील, मात्र हे सारे काही सोपे नाही. त्यासाठी खूप काही सहन करावे लागते. मात्र देशासाठी हे काम करावे लागते, असे मोदींनी सांगितले.
दिल्लीतील विज्ञान भवन येथे असोचेमच्या वार्षिक परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले की, देशाला संकटांपासून मुक्ती मिळवून देताना अनेक लोकांचा रोष सहन करावा लागतो. आरोप झेलावे लागतात. मात्र असे असले तरी देशासाठी हे सारे काही करावे लागते. सत्तर वर्षे लागलेली सवय बदलण्यास वेळ लागतो. पण हे देशासाठी करावे लागते.'' असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण संबोधनात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा नामोल्लेख करणे टाळले. मात्र इशाऱ्यांमधून त्यांनी आपले म्हणणे उपस्थितांसमोर मांडले. ते म्हणाले की, ''हे सर्व असेच झाले असे वाटते का? अशा निर्णयांसाठी अनेक लोकांची नाराजी ओढवून घ्यावी लागते. अनेकांचा राग सहन करावा लागतो. तऱ्हेतऱ्हेचे आरोप सहन करावे लागतात.'' पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे विधान आपल्या सरकारने अर्थव्यवस्थेने घेतलेल्या निर्णयांच्या संदर्भाने केले होते. मात्र अनेक लोकांची नाराजी आणि रोष ओढवून घेण्याची गोष्ट त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात होत असलेल्या तीव्र आंदोलनाकडे इशारा करत केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आपले सरकार हे समाजातील प्रत्येक वर्गाचे म्हणणे ऐकते असा दावा त्यांनी केला. आज देशात असे सरकार आहे जे शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकते, मजुरांचे म्हणणे ऐकते, व्यापाऱ्यांचे ऐकते आणि उद्योग जगताचेही ऐकते. तसेच त्यांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करते, असे मोदी म्हणाले.