राष्ट्रपती भवनात ४८ तासांपासून शिजतेय डाळ, मोदींच्या शपथविधीसाठी खास मेन्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 01:31 PM2019-05-30T13:31:50+5:302019-05-30T13:34:30+5:30
शपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीला पाहुण्यांसाठी 'हाय टी' असेल.
लोकसभा निवडणुकीतील भाजपा आणि एनडीएच्या अभूतपूर्व यशाचे शिल्पकार नरेंद्र मोदी आज पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनाच्या भव्य वास्तूत हा सोहळा आयोजित करण्यात आलाय. उद्योग, सिनेमा, साहित्य, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांसह तब्बल सहा हजार मान्यवर या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. स्वाभाविकच, हा शपथविधी सोहळा भव्य असेल. पण तो साधेपणाने करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पाहुण्यांचा पाहुणचार चवदार, चविष्ट पदार्थांनी केला जाणार असून राष्ट्रपती भवनाची खासियत असलेली 'दाल रायसीना' बनवण्याचं काम ४८ तासांपासून सुरू आहे.
शपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीला पाहुण्यांसाठी 'हाय टी' असेल. त्यावेळी चहा-कॉफीसोबत सामोसे, पनीर टिक्का, राजभोग आणि लेमन टार्टचा आस्वाद घेता येईल. रात्री ९ वाजता भोजनाला सुरुवात होणार असून त्यात व्हेज आणि नॉन व्हेज पदार्थ असतील. त्यात 'दाल रायसीना' ही खास डिश असेल.
काळी उडीद डाळ वापरून दाल रायसीना हा पदार्थ बनवला जातो. ही डाळ शिजायला बराच वेळ लागतो. रात्रभर ती पाण्यात भिजवून ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी चार ते पाच वेळा धुऊन कुकरमध्ये काढली जाते. त्यानंतर त्यात विशिष्ट मसाले टाकून मंद आचेवर शिजवली जाते. मंगळवार रात्रीपासून हे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारी सामग्री खास लखनऊहून मागवण्यात आली आहे. त्यामुळे शपथविधीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी ही 'ट्रिट'च ठरणार आहे.
अखेर रामदास आठवलेंना फोन आला; अमित शहांनी दिले मंत्रिपदाचे निमंत्रणhttps://t.co/tEti42f6Ao
— Lokmat (@MiLOKMAT) May 30, 2019
टाटा, अंबानी, कंगना अन् रजनी... मोदींच्या शपथविधीला दिग्गजांची मांदियाळीhttps://t.co/194pJy7oZd
— Lokmat (@MiLOKMAT) May 30, 2019