नादच खुळा... रामदास आठवलेंची शपथही ठरली सर्व मंत्र्यांपेक्षा वेगळी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 09:32 PM2019-05-30T21:32:10+5:302019-05-30T22:31:39+5:30
'नमो 2.0' च्या शपथविधी सोहळ्यातही रामदास आठवले यांचं वेगळेपण प्रकर्षाने जाणवलं.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या भन्नाट कवितांसाठी ओळखले जातातच, पण ते आपल्या पेहेरावातून, आविर्भावातून आपलं वेगळेपणही दाखवून देत असतात. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात, हजारो मान्यवरांसमोर झालेल्या 'नमो 2.0' च्या शपथविधी सोहळ्यातही त्यांचं हे वेगळेपण प्रकर्षाने जाणवलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार आणि शेवटी राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. रामदास आठवले वगळता सर्वांनी 'मैं ईश्वर की शपथ लेता हूं...' असं म्हटलं. परंतु, आठवलेंनी 'मैं रामदास आठवले सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं...' अशी शपथ घेतली आणि स्वाभाविकच ती इतरांपेक्षा हटके ठरली. याशिवाय, लोक जनशक्ती पार्टीचे(लोजपा) प्रमुख रामविलास पासवान यांनी सुद्धा 'मैं ईश्वर की शपथ लेता हूं...' असं म्हटलं नाही. तर त्यांनीही 'मैं रामविलास पासवान सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूं...' असं म्हणत शपथ घेतली.
नरेंद्र मोदी संघ स्वयंसेवक असल्यापासूनचे त्यांचे मित्र तेलंगणातील खासदार जी. किशन रेड्डी यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 'भारत माता की जय' असा खणखणीत नारा दिला, तोही लक्षवेधी ठरला.
दक्षिण मुंबईतून निवडून आलेले शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचं नाव कालच निश्चित झालं होतं. तमाम शिवसैनिकांना त्यांच्या शपथेबद्दल उत्सुकता होती. बहुतांश शिवसेना खासदारांनी मराठीत शपथ घेण्याचं जाहीर केल्यानं अरविंद सावंत मंत्रिपदाची शपथही मराठीत घेतील, असं अनेकांना वाटलं होतं. पण, सावंत यांनी हिंदीत शपथ घेतली.
'मोदी सरकार - २' मधील शिलेदार... जाणून घ्या कोण-कोण आहेत नवे भिडू! #ModiSarkar2#ModiSwearingIn#ModiCabinethttps://t.co/ivOI3Bwrf9
— Lokmat (@MiLOKMAT) May 30, 2019
'मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं...' #ModiSarkar2#ModiSwearingInhttps://t.co/SgVjCANPFN
— Lokmat (@MiLOKMAT) May 30, 2019
#WATCH live from Delhi: Narendra Modi takes oath as the Prime Minister of India for a second term. https://t.co/7neznqEfNn
— ANI (@ANI) May 30, 2019