पोस्टाच्या तिकिटावर स्वत:चा फोटो छापायचाय?; फक्त 300 रुपयांत सहज शक्य, जाणून घ्या नेमकं कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 05:09 PM2021-02-04T17:09:08+5:302021-02-04T17:16:39+5:30
Postal Stamp : नागरिकांना आता स्वत:चा फोटोही टपाल तिकीटावर छापता येणार आहे.
नवी दिल्ली - पोस्टाची तिकिटं पाहिल्यावर अनेकांना यावर आपला देखील फोटो त्यावर असावा असं वाटतं असतं. महान व्यक्ती किंवा महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या लोकांचे फोटो टपाल तिकिटावर छापण्याची प्रथा होती. मात्र आता नागरिकांना आता स्वत:चा फोटोही टपाल तिकिटावर छापता येणार आहे. तसेच कुटुंबीयांचा फोटो किंवा लग्नाच्या निमित्ताने पती-पत्नी आपला फोटो तिकिटावर छापू शकतात. यासाठी फक्त 300 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
पोस्टाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारत सरकारची ही जुनी योजना आहे. मात्र अनेक लोकांना त्याबाबत माहिती नव्हती. या योजनेच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीही टपाल तिकिटावर स्वत:चा फोटो छापू शकतो. 'माय स्टॅम्प' (My Stamp) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेतंर्गत टपाल तिकिटावर फोटो छापण्यासाठी फक्त 300 रुपये इतका खर्च येतो. यामध्ये तुम्हाला 12 टपाल तिकिटे मिळतील. विशेष म्हणजे ही तिकिटं इतर टपाल तिकिटांप्रमाणे देशातील कोणत्याही भागात पाठवता येणार आहे.
जाणून घ्या, फोटो छापण्यासाठी नेमकं काय करावं लागेल?
माय स्टॅम्प योजनेअंतर्गत 300 रुपयांत तिकिटावर फोटो छापता येणार आहे. टपाल तिकिटावर स्वत:चा फोटो छापण्यासाठी किमान 1 शीट (12 तिकीटे) विकत घ्यावी लागतील. तुम्ही 5000 शीट खरेदी केल्यास तुम्हाला 20 टक्के डिस्काऊंटही मिळेल. 5000 शीटची किंमत प्रतिशीट 300 रुपयांप्रमाणे 15 लाख इतकी होते. मात्र, यावर 20 टक्के सूट असल्याने तुम्हाला फक्त 12 लाख रुपयेच भरावे लागतील.
फोटो छापण्यासाठी ही आहे अट
तिकिटावर फोटो छापण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. ज्या व्यक्तीचा फोटो छापायचा आहे ती व्यक्ती जिवंत असणं गरजेचं आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा. तिथे याबाबत माहिती मिळेल तसेच https://www.indiapost.gov.in/Philately/Pages/Content/My-Stamp.aspx या वेबसाईटवरही या योजनेची माहिती उपलब्ध आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.