PM Modi Security Breach: सुरक्षेतील त्रुटीनंतर PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट, सांगितलं नेमकं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 02:44 PM2022-01-06T14:44:45+5:302022-01-06T14:46:07+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि काल पंजाबमध्ये त्यांच्या दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतील त्रुटींसंदर्भात माहिती घेतली.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही चिंता व्यक्त केली आहे. आज पंतप्रधान मोदींनी या संदर्भात राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. याशिवाय, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही या प्रकरणावर पंतप्रधान मोदींशी चर्चा केली आहे. (President Ramnath Kovind met prime minister Narendra Modi)
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील या त्रुटीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत, उपराष्ट्रपती म्हणाले, सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावले उचने आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा त्रुटी पुन्हा होणार नाहीत.
राष्ट्रपती कोविंद यांनी घेतली सुरक्षेतील त्रुटिंची संपूर्ण माहिती -
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्विटर हँडलवरून या बैठकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पोस्ट करत लिहिन्यात आले आहे, की ''राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि काल पंजाबमध्ये त्यांच्या दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतील त्रुटींसंदर्भात माहिती घेतली. राष्ट्रपतींनी या गंभीर चुकीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.''
President Ram Nath Kovind met Prime Minister Narendra Modi at the Rashtrapati Bhavan today and received from him a first-hand account of the security breach in his convoy in Punjab yesterday. The President expressed his concerns about the serious lapse. pic.twitter.com/lzvAuriuGb
— President of India (@rashtrapatibhvn) January 6, 2022
चन्नी सरकारकडून उच्चस्तरीय समितीही स्थापन -
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षिततेतील त्रुटींच्या मुद्द्यावर पंजाबमधील चन्नी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी चन्नी सरकारने उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल तयार करेल. एका अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या समितीत निवृत्त न्यायमूर्ती मेहताब सिंग गिल आणि प्रधान सचिव (गृह व्यवहार आणि न्याय) अनुराग वर्मा यांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयात पोहोचले प्रकरण -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आली आहे. या प्रकरणावर शुक्रवारी (7 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेत पंजाब सरकारला योग्य निर्देश देऊन जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पुन्हा भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट -
तत्पूर्वी, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी पंजाबच्या राज्यपालांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला. पंजाब भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांकडे गृहमंत्री आणि डीजीपी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
नेमकं काय घडलं होतं? -
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर होते. येथे कारने हुसैनीवाला येथे जात असताना आणि हुसैनीवाला शहीद स्मारक 30 किलोमीटर अंतरावर असताना, एका फ्लायओव्हरवर पंतप्रधानांचा ताफा पोहोचल्यानंतर शेतकरी आंदोलकांनी अचानकपणे रस्ता अडविला. जवळपास 15 ते 20 मिनिटे पंतप्रधानांचा ताफा अडविण्यात आला. यानंतर, हुसैनीवाला येथे जाणे रद्द करून पंतप्रधानांचा ताफा भटिंडा येथे परतला आणि भटिंडा येथून विमानाने पंतप्रधान दिल्लीला रवाना झाले होते.