पंतप्रधान श्रमयोगी पेन्शन योजना देशभरात झाली लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:23 AM2019-03-06T04:23:46+5:302019-03-06T04:23:56+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ११ लाख ५१ हजार असंघटित कामगारांनी दिलेली १३ कोटी ५८ लाख ३१ हजार ९१८ रुपयांची रक्कम बँक खात्यात जमा करून पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची सुरुवात केली.
गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ११ लाख ५१ हजार असंघटित कामगारांनी दिलेली १३ कोटी ५८ लाख ३१ हजार ९१८ रुपयांची रक्कम बँक खात्यात जमा करून पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची सुरुवात केली. असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीनंतर ३ हजार रुपये देण्याची ही योजना आहे. याचा लाभ १0 कोटी असंघटित कामगारांना मिळणार आहे.
अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर केली होती. या कामगारांना साठ वर्षे पूर्ण होताच कायमस्वरूपी पेन्शन मिळाली, असा याचा
उद्देश आहे. योजनेसाठीचा पहिला हप्ता कामगारांना रोख भरायचा
असून, नंतरचे हप्ते त्यांच्या खात्यातून थेट या योजनेत जमा होतील.
योजनेचा अर्ज करण्यासाठी कामगारांना जवळच्या कॉमन सेंटरमध्ये जावे लागेल. अशी कॉमन सेंटर २0१४ साली केवळ ८0 हजार होती. आता त्यांची संख्या तीन लाख इतकी आहे.
या वेळी मोदी म्हणाले की, आतापर्यंत या कामगारांना निवृत्तीनंतर उत्पन्नाचे काहीच साधन नव्हते. त्यांना आता किमान तीन हजार रुपये पेन्शन निश्चितपणे मिळू शकेल. ४२ कोटी श्रमिक व कामगारांना ही योजना मी अर्पण करीत आहेत. आतापर्यंतच्या सरकारांनी गरिबांच्या नावावर मते मिळविली, पण त्यांचे भले मात्र कधीच केले नाही. मात्र, आमच्या सरकारने गरिबांसाठी असंख्य योजना गेल्या पाच वर्षांत राबविल्या आहेत. पैशांचे घोटाळे थांबावेत वा मध्ये दलाल घुसू नयेत, यासाठी सर्व योजनांतील रक्कम संबंधितांच्या थेट बँक खात्यांमध्ये
जमा होत आहेत. श्रमयोगी
योजनेतील पेन्शनची रक्कमही कामगारांच्या बँक खात्यांमध्येच जमा केली जाईल. (वृत्तसंस्था)
>काय आहे योजना
ज्यांचे वय १८ ते ४0 च्या दरम्यान आहे व उत्पन्न १५ हजार रुपयांपर्यंत आहे, अशांना याचा लाभ मिळेल. वय १८ असलेल्या कामगाराला दरमहा ५५ रुपये भरावे लागतील, तर २९ वय असलेल्यांना १00 रुपये जमा करावे लागतील.
ज्यांचे वय ४0 आहे, त्यांना मात्र योजनेसाठी दरमहा २00 रुपये भरावे लागतील. कामगार जितकी रक्कम भरतील, तितकीच सरकारही त्या योजनेत जमा करेल. या कामगारांना ६0 वर्षांनंतर रोजगार वा नोकरी नसेल, तेव्हा मासिक तीन हजार रुपये पेन्शन दिली जाईल.