पाकिस्तानवरुन आरोप केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली मनमोहन सिंग यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 12:24 PM2017-12-13T12:24:07+5:302017-12-13T12:30:40+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत परस्परांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांनंतर आज सकाळी संसदेबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट झाली.
नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत परस्परांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांनंतर आज सकाळी संसदेबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्परांना नमस्कार करुन हस्तांदोलन केले. तीन दिवसांपूर्वीच मोदींनी एका जाहीर सभेत बोलताना काँग्रेस नेते आणि पाकिस्तानच्या अधिका-यांमध्ये गुप्त बैठक झाल्याचा आरोप केला होता.
गुजरातमध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची पाकिस्तानचे माजी मंत्री आणि राजनैतिक अधिका-यांसोबत गुप्त बैठक झाली. या बैठकीला मनमोहन सिंग उपस्थित होते असा आरोप केला होता. मोदींच्या या आरोपाला मनमोहन सिंग यांनी सुद्धा जोरदार प्रत्युतर दिले होते. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने हताश नरेंद्र मोदी काँग्रेस पक्ष व त्याच्या नेत्यांविरुद्ध धादान्त खोटे आरोप करून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु याने आपण पंतप्रधानांच्या उच्च पदाची अप्रतिष्ठा करीत आहोत, याचेही त्यांना भान नसावे याची कीव वाटते, असे मनमोहन सिंग म्हणाले होते.
#Delhi Prime Minister Narendra Modi meets former PM Manmohan Singh at the Parliament. pic.twitter.com/PZeiDmoE69
— ANI (@ANI) December 13, 2017
संसदेबाहेर परस्परांची भेट घेतल्यानंतर मोदी आणि मनमोहन सिंग 2001 संसदेवरील हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आत निघून गेले. गुजरात निवडणुकीच्या प्रचारात भाजपावर जोरदार हल्लाबोल करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा यावेळी संसेदत उपस्थित होते. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि रवी शंकर प्रसाद यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
Delhi: Congress President-elect Rahul Gandhi, Union Minister Ravi Shankar Prasad and EAM Sushma Swaraj at the Parliament where they arrived to pay tribute to people who lost lives in 2001 Parliament attack pic.twitter.com/dIfgGYKjHL
— ANI (@ANI) December 13, 2017
आरोपांना उत्तर देताना काय म्हणाले मनमोहन सिंग
डॉ. मनमोहन सिंग यांनी अत्यंत खरमरीत निवेदन प्रसिद्ध केले. ते म्हणतात की, अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीत गुजरात निवडणुकीचा विषय कोणी काढला नाही की त्यावर अजिबात चर्चा झाली नाही. चर्चा फक्त भारत-पाकिस्तान संबंधांपुरतीच मर्यादित होती. त्या बैठकीला जे हजर होते त्यापैकी कोणावरही राष्ट्रद्रोहाचा आरोप केला जाऊ शकत नाही. गेल्या पाच दशकात मी सार्वजनिक जीवनात राहून देशासाठी केलेली सेवा सर्वज्ञात आहे. राजकीय कुरघोडी करण्यासाठी मोदींसह कोणीही माझ्या देशसेवेविषयी दुरान्वयानेही शंका घेऊ शकत नाही, असेही डॉ. सिंग यांनी ठामपणे नमूद केले.