तमिळनाडूच्या राजकारणात ‘पीएमके’चा भाव वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 06:18 AM2019-02-26T06:18:56+5:302019-02-26T06:19:05+5:30

लढती होणार दुरंगी; कमल हासन यांच्याकडे आता सर्वांचे लक्ष, १५ पेक्षा जास्त जागांवर वणीयार समाजाचा प्रभाव

PMK's rise in Tamil Nadu politics | तमिळनाडूच्या राजकारणात ‘पीएमके’चा भाव वधारला

तमिळनाडूच्या राजकारणात ‘पीएमके’चा भाव वधारला

googlenewsNext

मिळनाडूमध्ये लोकसभेसाठी दुरंगी लढतीचे चिन्ह स्पष्ट झाले आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा पक्ष निवडणुकांत उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे आणि कमल हासन यांची भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी अण्णाद्रमुक, पीएमके, भाजपा अशी युती आणि विरोधात द्रमुक, काँग्रेस, एमडीएमके, डावे पक्ष व इतर असा सामना रंगणार आहे.


दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्ष विस्कळीत झाल्यामुळे द्रमुक आघाडी एकतर्फी निवडणूक जिंकेल, असे वातावरण होते. पण गेल्या दोन महिन्यांत अण्णा द्रमुक, पीएमके, भाजपा यांनी सामंजस्य ठेवून युती केली. तामिळनाडूतील जागावाटपाचे चित्र पाहिल्यास राष्ट्रीय पक्षांपेक्षा एस. रामदास यांच्या पीएमके पक्षाचा भाव वधारल्याचे चित्र दिसते. द्रविडीयन राजकारणाला विरोध करणाऱ्या पीएमकेने एनडीएच्या युतीतील सात मतदारसंघ मिळवल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


एस. रामदास यांच्या पीएमके पक्षाची २०१४ मध्येही भाजपासोबत युती होती. त्यावेळी स्थानिक राजकीय घडामोडींचा फायदा भाजपा, पीएमके यांना झाला. या दोन्ही पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. तामिळनाडूतील वणीयार समाजाच्या मतांवर प्रभाव असणाऱ्या पीएमकेचा फायदा एनडीए आघाडीला होण्याची संधी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पीएमकेला ४.४४ टक्के मते मिळाली होती, तर २०१६च्या विधानसभा निवडणुकीत सहा टक्के मते मिळवली. त्या पक्षाला एकाही विधानसभा मतदारसंघात विजय मिळाला नाही, पण राज्यात पीएमकेचे ७५ उमेदवार दुसºया क्रमांकावर होते. केडरबेस्ड आणि वणीयार समाजाची गठ्ठा मते यामुळे धर्मपुरी, चिदंबरम, अर्कोणम, कुड्डलूर या भागांत पीएमकेची बाजू भक्कम मानली जाते. मागासवर्गीयांत येणारा वणीयार समाज हा शेतीप्रधान मानला जातो.
तामिळी राजकारणात सध्या पीएमकेचे प्रस्थ वाढत असून, राज्यातील एकूण ३९ जागांपैकी १५ पेक्षा जास्त जागांवर वणीयार समाजाचा मोठा प्रभाव आहे. उत्तर आणि पश्चिमी तामिळनाडूच्या पट्ट्यात पीएमके-अण्णाद्रमुक ही युती विजयाचे समीकरण यशस्वी ठरू शकते. पीएमकेने एनडीएशी हातमिळवणी केली नसती तर द्रमुकने या पट्ट्यात एकतर्फी आघाडी घेतली असती. पण त्याला आता या नव्या समीकरणामुळे खो बसणार आहे.


तामिळनाडूतील सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला पक्ष निवडणुका लढवणार नाही, असे जाहीर केले आहे. मात्र ते निवडणुकीच्या तोंडावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी काहीच भूमिका न घेतल्यास त्यांचे समर्थक अर्थातच नाराज होतील. पण त्यांचा पक्ष रिंगणात उतरणार नसल्याचा फायदा आपणास होईल, असे भाजपा नेते सांगू लागले आहेत. रजनीकांत यांनी भाजपाला पाठिंबा द्यावा वा समझोता करावा, यासाठी त्यांनी मनधरणी करण्याचा खूप प्रयत्न भाजपा नेत्यांनी केला होता. त्यात यश आले नाही. पण रजनीकांत नसल्याने त्यांच्या अनुयायांची मते आपणास मिळतील, असे भाजपाला वाटत आहे.
दुसरीकडे आणखी एक सुपरस्टार कमल हासन यांनी मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरवल्याचे दिसत आहे. तुमचा पक्ष भाजपाची बी टीम आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला, तेव्हा ते खूपच भडकले. माझा पक्ष भाजपाची बी टीम नव्हे, तर तामिळनाडूच्या राजकारणातील ए टीम आहे, असे त्यांनी सोमवारी बोलून दाखवले.
त्यामुळे ते कोणाशीच समझोता न करता निवडणुका लढवणार, असे चित्र आहे. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची घेतलेली भेट आणि त्यांची भाजपाविरोधी भूमिका याचा फायदा द्रमुक-काँग्रेस आघाडीला होईल, अशी आतापर्यंतची चर्चा होती. पण त्यांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला, तर त्याचा फायदा कोणाला होईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

विधानसभेत फटका बसू नये म्हणून पीएमके सावध
केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील अण्णा द्रमुक सरकार यांच्याविरोधात तामिळी जनतेत असंतोषाचे वातावरण दिसत आहे. या वातावरणाचा अंदाज घेत अंबुमणी रामदास यांनी आपली युती ही अण्णा द्रमुकशी असून, भाजपा त्या युतीचा एक घटक पक्ष असल्याचा प्रचार सुरू केला आहे. भाजपाच्या जवळीकीचा फटका बसू नये, याची काळजी पीएमके नेते घेताना दिसत आहेत. लोकसभेला भाजपाचा फायदा जरी झाला तरी विधानसभेला याचा आपल्याला फटका बसतो, याची प्रचिती पीएमके नेत्यांना २०१६च्या विधानसभा निवडणुकीत आली होती.

Web Title: PMK's rise in Tamil Nadu politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.