रायसोनी घोटाळ्याची ‘पीएमओ’ने घेतली दखल
By Admin | Published: March 28, 2015 01:21 AM2015-03-28T01:21:10+5:302015-03-30T01:30:13+5:30
रायसोनी बहुराज्य सहकारी पतसंस्थेतील घोटाळयाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतल्याने राजधानीतील जंतरमंतर येथे दोन दिवसांपासून सुरू झालेले उषोषण मागे घेण्यात आले.
उपोषण मागे : १५ दिवसांत ताजा अहवाल
नवी दिल्ली : जळगावात मुख्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्य सहकारी पतसंस्थेतील घोटाळयाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतल्याने राजधानीतील जंतरमंतर येथे दोन दिवसांपासून सुरू झालेले उषोषण मागे घेण्यात आले.
पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणी हस्तक्षेप केला असून, १५ दिवसात अहवाल मागवून त्यानंतर कारवाईची दिशा निश्चित करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने पंतसंस्थेचे खातेदार सतीश बोधनकर, विजय मनुरकर, राजेश उत्तरवार यांच्यासह काही ठेवीदारांनी सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आले. गुरूवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांंना पाचारण केले. तिथे सतीश बोधनकर यांचे म्हणणे लेखी स्वरूपात नोंदवून घेण्यात आले. त्यानंतर उपोषण मागे घेण्याची सूचना करण्यात आली. मात्र उपोषणकर्त्यांनी कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी संचालकांची सुनावणी घेतल्यावर संचालकांची मालमत्ता जप्त करून पंतसंस्थेवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिल्याचे सांगून ठरलेल्या मुदतीत पंतप्रधान कार्यालयाचा अहवाल आणि कृषिमंत्र्याच्या आदेशाची अंमलबजावणी होणार असेल तरच उपोषण मागे घेऊ असे सांगून ही पूर्तता झाली नाही तर २० एप्रिलपासून पुन्हा उपोषणास बसण्याचा इशारा दिला.