कोहिनूर हिरा भारतात आणण्यासाठी काय केलंत?; माहिती आयोगाचा पीएमओला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 05:48 PM2018-06-04T17:48:25+5:302018-06-04T17:48:25+5:30
पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला माहिती आयोगाचा सवाल
नवी दिल्ली: कोहिनूर हिरा आणण्यासाठी कोणती पावलं उचलण्यात आली, असा सवाल केंद्रीय माहिती आयोगानं पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला विचारला आहे. याशिवाय महाराजा रणजीत सिंह यांचं सोन्याचं सिंहासन, शाहजहानचा मद्यपानाचा ग्लास आणि टिपू सुलतानची तलवार यांच्यासारख्या प्राचीन वस्तू भारतात आणण्यासाठी नेमके काय प्रयत्न करण्यात आले, असा प्रश्नदेखील केंद्रीय माहिती आयोगानं उपस्थित केला आहे.
कोहिनूर हिरा भारतीय लोककथेचा भाग समजला जातो. या हिऱ्यासह अनेक मौल्यवान वस्तू इंग्रज भारतातून मायदेशी घेऊन गेले होते. या वस्तूंसोबतच इतरही अनेक वस्तू भारताबाहेर नेण्यात आल्या. सध्या या वस्तू जगभरातील संग्रहालयांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंबद्दलची माहिती मिळवण्यासाठी एका माहिती अधिकार कार्यकर्त्यानं पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज केला होता. मात्र त्या व्यक्तीचा अर्ज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे (एएसआय) पाठवण्यात आला. 'या वस्तू भारतात आणण्याचे प्रयत्न करणं आमच्या अधिकारक्षेत्रात येत नाही', असं उत्तर पुरातत्व सर्वेक्षण विभागानं या माहिती अधिकार कार्यकर्त्याला दिलं.
माहिती अधिकार कार्यकर्ते बी. के. एस. आर. अय्यंगार यांनी कोहिनूर हिऱ्यासह अनेक मौल्यवान वस्तूंची माहिती सरकारकडे मागितली होती. सुलतानगंज बुद्धा, टिपू सुलतान यांची तलवार, महाराजा रणजीत सिंह यांचं सोन्याचं सिंहासन, शाहजहान मद्यपान करण्यासाठी वापरत असलेला ग्लास, सरस्वतीची संगमरवरी मूर्ती या वस्तू भारतात आणण्यासाठी सरकारने कोणते प्रयत्न केले, असा प्रश्न अय्यंगार यांनी माहिती अधिकारातून उपस्थित केला होता.