पीएमओ करणार महत्त्वपूर्ण पदांवर तातडीने भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 05:35 AM2021-10-17T05:35:57+5:302021-10-17T05:36:41+5:30
मुख्य केंद्रीय दक्षता आयुक्त, अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक ही पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचे समजते.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : अनेक केंद्रीय संस्था हंगामी प्रमुखांच्या नेतृत्वाखाली चालविण्यात येत असल्यामुळे होणाऱ्या टीकेला पूर्णविराम देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) ही पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुख्य केंद्रीय दक्षता आयुक्त, अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक ही पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचे समजते.
एनआयए या संस्थेचे कामकाज अस्थायी प्रमुखांकडून चालविण्यात येत असून, ईडीला नव्या प्रमुखांची प्रतीक्षा आहे. पंतप्रधानांच्या दोन सल्लागारांसह अनेकांची गच्छंती करण्यात आली आहे. त्या जागा भरण्यात येत आहेत. झारखंड आयएएस केडरचे निवृत्त अधिकारी अमित खरे यांची पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. ईडीच्या प्रमुख पदावर २०१८ पासून मुदवाढ मिळविणारे संजय मिश्रा हे १८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सीमांचल दास यांची नेमणूक होणार असल्याचे समजते. त्यांनी अरुण जेटली यांचे ओएसडी म्हणून तब्बल २० वर्षे काम केलेले आहे. अलीकडेच अमुधा परियास्वामी यांना तामिळनाडू केडरला परत पाठवून पुण्यसलिल श्रीवास्तव यांना पीएमओच्या अतिरिक्त सचिवपदी नेमण्यात आले.