पंतप्रधानांचे विशेष बिहार पॅकेज केवळ ‘रिपॅकेजिंग’
By admin | Published: August 27, 2015 04:15 AM2015-08-27T04:15:27+5:302015-08-27T09:45:03+5:30
बिहारला १.२५ लाख कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा केवळ जुन्या योजनांचे ‘रिपॅकेजिंग’ आहे, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री
पाटणा : बिहारला १.२५ लाख कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा केवळ जुन्या योजनांचे ‘रिपॅकेजिंग’ आहे, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या विशेष पॅकेजमधील १ लाख ८ हजार कोटी रुपये म्हणजेच सुमारे ८५ टक्के रक्कम जुन्या योजनांमधील असल्याचा दावाही नितीश यांनी केला आहे.
बुधवारी पत्रकारांशी बोलताना नितीश यांनी हा दावा केला. पंतप्रधानांनी बिहारसाठी घोषित केलेल्या विशेष पॅकेजचा अभ्यास करून त्यातील सत्य लोकांसमोर यावे, या हेतूने आम्ही हा खुलासा करीत असल्याचे नितीश म्हणाले. मोदींनी बिहारला लाखो कोटींचे पॅकेज दिल्याचे लोकांना वाटत आहे; पण असे काहीही नाही. पॅकेजच्या नावावर हे केवळ ‘रिपॅकेजिंग’ आहे. केवळ ‘पॅकेज पॉलिटिक्स’ आहे. आगामी निवडणुकींवर डोळा ठेवून लोकांना गाजर दाखविण्यासाठी ‘पॅकेज पॉलिटिक्स’ सुरू आहे. (वृत्तसंस्था)
असे आहे ‘रिपॅकेजिंग’!
प्रस्तावित आणि सध्या सुरू असलेल्या अनेक योजना व प्रकल्पांचे एक लाख आठ हजार कोटी रुपये ‘रिपॅकेज’ करून विशेष पॅकेजमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. उर्वरित सहा हजार कोटी रुपयांच्या केवळ पोकळ बाता आहेत. कारण सहा हजार कोटींच्या प्रत्यक्ष वापराबाबत काहीही तपशील नाही. १.२५ लाख कोटींच्या पॅकेजमधील केवळ १०,३६८ कोटी रुपयांचा निधी अतिरिक्त आहे, असा दावा नितीश कुमार यांनी केला. पॅकेजची ही रक्कम केव्हा व कशी मिळेल याबाबतही काहीच न सांगण्यात आल्याने सगळेच अधांतरी आहे, असेही ते म्हणाले.