ईपीएफवरील कर मागे घेण्याची पंतप्रधानांची अर्थमंत्र्यांना सूचना?
By Admin | Published: March 5, 2016 02:26 PM2016-03-05T14:26:07+5:302016-03-05T14:28:14+5:30
ईपीएफमधून रक्कम काढल्यावर कर लावण्याच्या प्रस्तावावरून जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागल्याने पंतप्रधान मोदींनी अर्थमंत्री अरूण जेटलींना या प्रस्तावाबाबत पुनर्विचार करण्याची सूचना केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - भविष्य निर्वाह निधीतून (ईपीएफ) रक्कम काढल्यावर कर लावण्याच्या प्रस्तावावरून जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने पंतप्रधान मोदींनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींना हा प्रस्ताव मागे घेण्याबाबत विचार करण्याची सूचना केल्याचे वृत्त आहे. येत्या मंगळवारी जेटली याबाबत संसदेत निवेदन करण्याची शक्यता आहे.
राजधानीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफवर कर आकारण्यासंदर्भातील निर्णयाचा फेरविचार करा असा सूचनावजा सल्ला पंतप्रधान मोदींनी जेटलींना दिला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून ६० टक्के रक्कम काढल्यास त्यावर कर लावण्याचा प्रस्ताव बजेटमध्ये मांडण्यात आला. एक एप्रिल नंतर ईपीएफमध्ये जमा होणा-या रकमेसाठी ही तरतूद होती. मात्र या निर्णयावरून बरीच ओरड झाल्यानंतर अर्थमंत्र्यांनी नमते घेत या विषयावर चर्चा करण्याची भूमिका घेतली. संसदेमध्ये बजेटवर ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी यावर अंतिम निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता खुद्द पंतप्रधानांनीच त्यांना आपल्या प्रस्तावाचा फेरविचार करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता येत्या मंगळवारी जेटली संसदेत याप्रकरणी नेमकं काय निवेदन करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.