पी.एन.- सतेज पाटील यांची वेळ चुकली

By admin | Published: January 16, 2017 12:44 AM2017-01-16T00:44:58+5:302017-01-16T00:44:58+5:30

मोबाईलवरूनच चर्चा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात काँग्रेस कमिटीमध्ये भेट होणार होती

PN-Satej Patil missed the time | पी.एन.- सतेज पाटील यांची वेळ चुकली

पी.एन.- सतेज पाटील यांची वेळ चुकली

Next



कोल्हापूर : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांची रविवारी दुपारी ठरलेली भेट झाली नाही. महत्त्वाच्या कामामुळे सतेज यांना काँग्रेस कमिटीत येण्यास उशीर झाला आणि ‘भोगावती’ला बैठक असल्याने पी. एन. पाटील निघून गेले. मात्र, मोबाईलवरून आपले बोलणे झाल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार बजरंग देसाई यांच्यासह काही तालुकाध्यक्षांना रविवारी सकाळी काँग्रेस कमिटीत येण्याबाबत निरोप गेले होते. तर पी. एन. आणि सतेज यांच्यात दुपारी बारा वाजता भेटायचे ठरले होते. मात्र, सतेज पाटील यांना दुसऱ्या कामामुळे येण्यास उशीर झाला. तोपर्यंत पी.एन. यांनी भरमूअण्णा आणि बजरंग देसाई, चंदगड तालुकाध्यक्ष नामदेव दळवी यांच्याशी निवडणुकीबाबत चर्चा केली. दुपारी एकच्या दरम्यान पी. एन. काँग्रेस कमिटीतून बाहेर पडले. त्यानंतर सतेज पाटील आले. त्यांनी भुदरगडचे काँग्रेस तालुकाध्यक्ष शामराव देसाई, सचिन घोरपडे, गगनबावड्याचे तालुकाध्यक्ष बजरंग पाटील यांच्याशी चर्चा केली.
चंदगडमध्ये भरमूअण्णा पाटील आणि नरसिंगराव पाटील गट एकत्र येणार असून, गडहिंग्लजमध्ये दोन्ही काँग्रेस एकत्र लढतील, असे चित्र आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी काँग्रेस अडचणीत असताना पी. एन. आणि सतेज पाटील यांनी किमान काही मुद्द्यांवर एकत्र यावेत, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, ‘गोकुळ’मधील महादेवराव महाडिक, पी. एन. यांचे संयुक्त नेतृत्व पी. एन. यांना एकतर्फी निर्णय घेणे अडचणीचे ठरत आहे. जिल्हांतर्गत राजकारणामध्ये सतेज पाटील आणि प्रकाश आवाडे हे पी. एन. यांचे अंतर्गत विरोधक मानले जातात. या पार्श्वभूमीवर दोन्ही निवडणुकीत काँग्रेस पक्ष एकसंघपणे कसा सामोरा जातो, यावर यश अवलंबून आहे.

तालुकाध्यक्षांशी चर्चा
पी. एन. पाटील म्हणाले, रोज तालुकाध्यक्षांच्या बैठका सुरू आहेत. त्यानुसार चंदगड, भुदरगडच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. निवडणुकीच्या निमित्ताने सातत्याने बैठका सुरूच आहेत. भोगावती कारखान्याची निवडणूक लागल्याने तिथलेही नियोजन सुरू आहे.
आजऱ्याहून श्रीपतराव देसाई यांचा फोन
सतेज पाटील यांची वाट पाहत सचिन घोरपडे आणि भुदरगडचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई थांबले होते. याच दरम्यान आजरा येथील जनता बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव देसाई यांचा घोरपडे यांना फोन आला. त्यांनी सतेज पाटील यांच्याकडे फोन दिला. दोन दिवसांत भेटायला या, असा निरोप पाटील यांनी दिला. देसाई यांचे स्थानिक महाआघाडीशी बिनसले असून, त्यांना पेरणोली पंचायत समितीची उमेदवारी हवी आहे. तर देसाई यांनी आजरा कारखान्याचे संचालकपद देण्याचा ‘शब्द’ पाळला न गेल्याने त्यांची नाराजी आहे. ते भाजपकडे जाऊन उमेदवारी घेतील. त्यापेक्षा त्यांना काँग्रेसमध्ये घ्या. पुढे विधानसभेसाठी राधानगरी, भुदरगड, आजरा मतदारसंघांसाठी सोयीचे ठरेल, असे सांगण्यात आले.

Web Title: PN-Satej Patil missed the time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.