घोटाळेबाजांची गय केली जाणार नाही, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 10:33 PM2018-02-20T22:33:45+5:302018-02-20T22:33:59+5:30
पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी फरार झाल्यापासून मोदी सरकारच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. इतके दिवस मौन बागळलेल्या अरुण जेटलींनी अखेर या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी नीरव मोदी फरार झाल्यापासून मोदी सरकारच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. इतके दिवस मौन बागळलेल्या अरुण जेटलींनी अखेर या प्रकरणावर भाष्य केलं आहे. देशाची फसवणूक करणा-या घोटाळेबाजांची गय केली जाणार नाही, असं अरुण जेटली म्हणाले आहेत.
असोसिएशन ऑफ डेव्हलपिंग फायनान्सिंग इंस्टिट्युशन इन एशिया अँड पॅसिफिकच्या कार्यक्रमात ते बोलत होते. नीरव मोदी प्रकरणावरून अरुण जेटलींनी ऑडिटर्सनाही खडे बोल सुनावले आहेत. एवढे मोठे घोटाळे होत असताना ऑडिटर्स, बँक व्यवस्थापन काय करत होते, असा सवाल जेटलींनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला.
या घोटाळ्यात संशयित असलेले बडे व प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तिघे देश सोडून फरार झाले आहेत. या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरू असतानाच अरुण जेटलींनी या घोटाळ्याबाबत ऑडिटर्सला जबाबदार धरलं आहे. एवढा मोठा घोटाळा होत असताना बँक व्यवस्थापन आणि ऑडिटर्स काय करत होते ?, अंतर्गत व्यवहार आणि हिशेबांमध्ये घोळ होत असताना तुमच्या लक्षाच कसं आलं नाही ?, असं जेटली म्हणाले आहेत.
When authority is given to the managements then you are expected to utilize authority effectively and in the right manner and therefore question for management is if they were found lacking, on the face of it seems they were: FM Arun Jaitley on banks pic.twitter.com/rwI7W38iaT
— ANI (@ANI) February 20, 2018
कोण आहे नीरव मोदी
सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला. घोटाळ्यात संशयित असलेले बडे व प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तिघे देश सोडून फरार झाले. नीरव मोदीची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. त्याने 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरू केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत. नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत.
47 वर्षीय नीरवचे वडील देखील हिरे व्यापारीच होते. नीरव वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला. नीरवला भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.
मल्ल्यापेक्षाही मोठा घोळ
याबाबत सीबीआयच्या सूत्रांनी स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला. मात्र आधी २८० कोटी रुपये व आता ११,५०० कोटी रुपये, या दोन्ही घोटाळ्यांची कार्यपद्धती सारखीच आहे. त्यामुळे आता सीबीआयने या संपूर्ण घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे. हा विजय मल्ल्यापेक्षाही मोठा बँक घोटाळा आहे, असे सांगण्यात आले.
तीन बँका संकटात
या घोटाळ्यात संबंधितांनी विदेशात राहून अन्य बँकांकडून कर्जे घेतल्याचे पंजाब नॅशनल बँकेने पत्रात नमूद केले आहे. अन्य बँकांमध्ये अलाहाबाद बँक, युनियन बँक आॅफ इंडिया व खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेचा समावेश असल्याचे बोलले जाते.
सर्वसामान्यांची रक्कम धोक्यात
पीएनबीमध्ये रिझर्व्ह बँक व सर्वसामान्य ठेवीदार यांच्यामार्फत पैसा येतो. समभागधारकांचाही पैसा बँकेत आहे. घोटाळ्याची तक्रार करताना बँकेने ‘संशयास्पद व्यवहार’ असा उल्लेख केला आहे. ही खाती सर्वसामान्य ठेवीदारांची असून घोटाळा केलेल्यांची नावेही बँकेला माहीत नाहीत.