पीएनबी घोटाळा : 'नीरव मोदीला माझ्यासमोर आणा, त्याला चपलेने मारणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 11:39 AM2018-02-22T11:39:08+5:302018-02-22T11:40:04+5:30
पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 11 हजार 300 कोटींच्या घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाची (ईडी) छापेमारी सुरु आहे
नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) 11 हजार 300 कोटींच्या घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाची (ईडी) छापेमारी सुरु आहे. बुधवारी ईडीने मुंबईत 17 ठिकाणांवर छापेमारी केली. ईडी अधिका-यांनी मंगळवारी सांगितलं होतं की, हिरे व्यवसायिक नीरव मोदी आणि गितांजली समुहाचा प्रमुख मेहुल चोकसी यांच्यासहित 120 बोगस कंपन्यांसोबत तार जोडले गेलेले आहेत. बँकांतून घेण्यात आलेले पैसे बोगस कंपन्यांमध्ये लावण्यात आले असावेत असा अधिका-यांचा अंदाज असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे. दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयच्या अधिका-याने पीएनबीच्या काही अधिका-यांची चौकशी सुरु केली आहे. यादरम्यान आरोपी अर्जुन पाटीलची पत्नी सुजाता पाटील यांनी एक वक्तव्य केलं आहे. 'माझे पती गेल्या 10 वर्षांपासून काम करत आहे. काही कर्मचा-यांप्रमाणे ते पेपरवर्क करत होते. या सगळ्यासाठी नीरव मोदी जबाबदार आहे. त्याला माझ्यासमोर आणा. समोर आला तर त्याला चपलेने मारेन', असं त्या बोलल्या आहेत.
Mere pati 10 saal se kaam kar rahe hain wahan, kuch logon ki tarah woh bhi paperwork karte the. Nirav Modi inn sab ke liye zimmevar hai, usko mere saamne lao woh ayega toh main usse chappal se maarungi: Sujata Patil, Wife of accused Arjun Patil. #PNBFraudCasepic.twitter.com/C4XDKOCj4X
— ANI (@ANI) February 21, 2018
पंजाब नॅशनल बँकेतून नीरव मोदीला इतर बँकांना देण्यासाठी २००८ सालापासून बनावट हमीपत्रे देण्यात येत होती, अशी कबुली पीएनबीचा निवृत्त उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी याने सीबीआयला दिली आहे. ही माहिती सीबीआयने बुधवारी न्यायालयाला दिली. शेट्टीला शुक्रवारी सीबीआयने अटक केली. या घोटाळ्यात बँकेच्या फॉरेक्स विभागाचा मुख्य व्यवस्थापक बेचू तिवारी, एक व्यवस्थापक यशवंत जोशी, अधिकारी प्रफुल्ल सावंत यांना सोमवारी सीबीआयने अटक केली होती.
नीरव मोदीचे अलिबागजवळील फार्म हाउस बुधवारी जप्त केले. समुद्राला लागून असलेल्या आणि दीड एकरावर असलेल्या १२ हजार चौरस फूट बांधकामाच्या फार्म हाउसची किंमत २४ कोटी रुपये आहे. याखेरीज प्राप्तिकर विभागाने नीरव मोदीची १४१ बँक खाती गोठविली असून, त्यातील १४५ कोटी रुपयांची मालमत्ताही ताब्यात घेतली आहे. प्राप्तिकर विभागाने रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारीचीही २१ बँक खाती गोठवली आहेत आणि त्याची सुमारे ६५ कोटींची मालमत्ता हस्तगत केली आहे.
शेट्टीचे कारनामे : सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, पीएनबीच्या फॉरेक्स विभागातील गोकुळनाथ शेट्टी व कारकून मनोज खरात यांनी २८० कोटींच्या व्यवहारासाठी मोदीला ८ बनावट हमीपत्रे ९, १० व १४ फेब्रुवारी २०१७ रोजी दिली.
बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी शाखेचा माजी प्रमुख राजेश जिंदाल याला बुधवारी अटक करण्यात आली. या घोटाळ्यात बँकेच्या सरव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) दर्जाच्या अधिका-यास पहिल्यांदाच अटक झाली आहे. अटक झालेल्या पीएनबी अधिकाºयांची संख्या आता ६ झाली आहे. जिंदाल हा २00९ ते २0११ या काळात ब्रॅडी हाउस शाखेचा प्रमुख होता. याशिवाय मंगळवारी मोदीच्या कंपनीच्या वित्त विभागाचा प्रमुख विपुल अंबानी याच्यासह ५ जणांना अटक करण्यात आलीच होती. दरम्यान, नीरव मोदीने भारतातील आपल्या सर्व कर्मचा-यांना तुम्ही अन्यत्र नोक-या शोधा, असे सांगितले आहे, तसेच त्यांना पगार देणे शक्य नसल्याचेही कळविण्यात आले आहे.