पीएनबीला चुना लावणारा नीरव मोदी परदेशी बँकांचं कर्ज फेडायला तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 12:07 PM2018-11-14T12:07:09+5:302018-11-14T12:07:20+5:30
एचएसबीसी आणि आयडीबीचं कर्ज फेडण्याची नीरवची तयारी
नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला कोट्यावधी रुपयांचा चुना लावून पसार झालेला नीरव मोदी अद्याप भारतीय यंत्रणांच्या हाती लागलेला नाही. पीएनबीमधील घोटाळा बाहेर येताच नीरवच्या देशातील मालमत्तांवर टाच आणण्यात आली. त्यानंतर नीरव मोदीनं आपली बदनामी झाल्याचा कांगावा करत बँकांचं कर्ज फेडण्यास नकार दिला. भारतीय यंत्रणांच्या कारवाईमुळे आपलं नुकसान झाल्यानं कर्जाची परतफेड करु शकत नाही, असं म्हणत नीरवनं हात वर केले. भारतीय बँकांचं कर्ज फेडण्यास नकार देणारा नीरव परदेशी बँकांचं कर्ज फेडण्यास तयार झाला आहे.
अमेरिकेच्या एचएसबीसी आणि इस्रायल डिस्काऊंट बँकेनं नीरव मोदीला कर्ज दिलं होतं. या बँकांनी नीरव मोदीविरोधात न्यूयॉर्कमधील न्यायालयात धाव घेतली. यानंतर न्यायालयानं नीरवच्या कंपन्यांना बँकांचं कर्ज फेडण्याच्या सूचना केल्या. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन कंपन्यांकडून देण्यात आलं आहे. न्यूयॉर्कमधील आयडीबीनं (इस्रायल डिस्काऊंट बँक) नीरवच्या तीन कंपन्यांना 2013 मध्ये 1 कोटी 20 लाख डॉलरचं कर्ज दिलं होतं. तर एचएसबीसीनं 2008 मध्ये 1 कोटी 60 लाख डॉलरचं कर्ज दिलं होतं.
नीरव मोदीनं एचएसबीसी आणि इस्रायल डिस्काऊंट बँकेकडून घेतलेलं कर्ज त्याच्या एकूण संपत्तीच्या तुलनेत अतिशय कमी आहे. नीरव मोदीच्या कंपन्यांची मालमत्ता ताब्यात घेऊन कर्जवसुली केली जाणार आहे. यासाठी काही मालमत्तादेखील निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये भारतीय यंत्रणांनी टाच आणलेल्या मालमत्तांचा समावेश आहे की नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पीएनबीला तब्बल 13 हजार कोटींचा चुना लावल्याचा आरोप नीरववर आहे.