PNB Scam : मेहुल चोकसीच्या सहकाऱ्याला अटक, ईडीची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 10:06 AM2018-11-06T10:06:07+5:302018-11-06T10:12:26+5:30
PNB Scam : पंजाब नॅशनल बँकेतील 14 हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातील एक आरोपी मेहुल चोकसीच्या एका सहकाऱ्याला कोलकात्यातून अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेतील 14 हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातील एक आरोपी मेहुल चोकसीच्या एका सहकाऱ्याला कोलकात्यातून अटक करण्यात आली आहे. दीपक कुलकर्णी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ईडी आणि सीबीआयनं संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँगहून परत आलेल्या दीपक कुलकर्णीला कोलाकाता विमानतळावर अटक करण्यात आली. मंगळवारी त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.
(नीरव मोदीकडून नऊ याचिका दाखल)
दरम्यान, पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याने विशेष पीएमएलए न्यायालयात वेगवेगळ्या नऊ याचिका दाखल केल्या. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तपासाला सहकार्य करत नसल्याच्या आरोपांसह अन्य आरोप मोदीने फेटाळले आहेत, तसेच या सर्व केसेस विशेष सीबीआय न्यायालयात वर्ग कराव्यात, अशी मागणी मोदीने केली आहे.
आपण फरार नाही, तसेच आपण तपासासाठी सहकार्य करत नाही, हा ईडीने केलेला दावा खोटा आहे, असे मोदी याने त्याच्या याचिकांत म्हटले आहे. न्यायालयाने सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांना आर्थिक फरारी गुन्हेगार म्हणून जाहीर करण्यात यावे व त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी, यासाठी ईडीने काही दिवसांपूर्वी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज सादर केला. या अर्जावर मोदीने उत्तर दिले आहे.
Deepak Kulkarni, an associate of #MehulChoksi has been arrested by the Enforcement Directorate in Kolkata after he landed at the airport from Hong Kong. Kulkarni was the director of Choksi’s dummy firm in Hong Kong. A Look Out Circular was issued against him by ED and CBI earlier pic.twitter.com/ENR8NIVeCL
— ANI (@ANI) November 6, 2018
दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार आरोपी नीरव मोदी याच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हाँगकाँगमध्ये कारवाई करून २५५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
पीएनबीमधील घोटाळ्यात नीरव मोदीसोबत त्याचा मामा मेहुल चोक्सीही सहभागी होता. या दोघांच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत त्यांची सुमारे ४,७४४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. नीरव मोदी याच्याविरुद्ध एक फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने काही मौल्यवान वस्तू २६ जहाजांमध्ये भरून हाँगकाँगला पाठविल्या. दुबईमधील त्याच्याच एका कंपनीने ही वाहतूक केली होती. हा ऐवज आता ईडीने जप्त केला आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रीच कँडी शाखेत तब्बल १२ हजार ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले. अॅक्सिस आणि अलाहबाद बँकेच्या परदेशी शाखांचाही या घोटाळ्यात फसगत झाल्याचे निदर्शनास आले. हा घोटाळ्याचा कट नीरव मोदी, मेहुल चोक्सी व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी रचल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मोदी व चोक्सी यांना अटक करण्यापूर्वीच त्यांनी देशाबाहेर पळ काढला.