PNB SCAM: मोठी बातमी! नीरव मोदीच्या बहिणीनं इंग्लंडमधील बँक खात्यातून भारत सरकारला पाठवले 17.25 कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 07:07 PM2021-07-01T19:07:29+5:302021-07-01T19:09:27+5:30
Nirav Modi : इग्लंडच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी एप्रिल महिन्यात नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यर्पण करण्याचा आदेश दिला होता.
नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी नीरव मोदीची बहीण आणि सरकारी साक्षीदार पूर्वीने (Purvi Modi) आपल्या इंग्लंडमधील बँक खात्यातील 17.25 कोटी रुपये भारत सरकारला पाठवले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती दिली आहे. (pnb scam ED says Nirav Modi sister Purvi Modi remitted approx 17. 25 crore to indian government)
यापूर्वी, इग्लंडच्या न्यायालयाने भारतातील पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला मोठा झाटका दिला आहे. यूके हायकोर्टाने 23 जूनला, नीरव मोदीने भारताकडे प्रत्यर्पण करण्याविरोधात केलेला अर्ज फेटाळून लावला आहे. महत्वाचे म्हणजे, इग्लंडच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी एप्रिल महिन्यात नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यर्पण करण्याचा आदेश दिला होता.
Purvi Modi (sister of Nirav Modi )remitted an amount of USD 2316889.03 from the UK Bank account to the bank account of Government of India, Directorate of Enforcement. Thus, ED was able to recover appx. Rs.17.25 Crore (USD 2316889.03) from the Proceeds of crime. pic.twitter.com/nVKjO0lxGO
— ED (@dir_ed) July 1, 2021
उल्लेखनीय आहे, की मेहुल चोकसी आणि नीरव मोदी यांच्यावर काही बँक अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून 13,500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. सध्या नीरव मोदी लंडनमधील एका कारागृहात कैद आहे. तर चोकसी डोमिनिकाच्या कारागृहात बंद आहे. या दोघांविरोधात केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआय चौकशी करत आहे आणि त्यांना भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मेहुल चोक्सीला आणण्याची जोरदार तयारी -
भारतातून परदेशात पळून गेलेल्या मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठीही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. डॉमिनिका सरकारने तर मेहुल चोक्सीला भारतात पाठवून देण्याची भूमिका घेतली आहे. तसेच, डॉमिनिकाच्या तुरुंगातून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या मेहुल चोक्सीला डॉमिनिका सरकारने घुसखोर म्हणूनही जाहीर केले आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी डॉमिनिका उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत मेहुल चोक्सी अद्यापही भारताचा नागरिक असल्याची ठाम भूमिका मांडली आहे.