कर्जवसुलीसाठी पीएनबीची गांधीगिरी; वर्षभर चालणार अनोखं अभियान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 10:29 AM2018-04-21T10:29:00+5:302018-04-21T10:29:00+5:30
दर महिन्याला 150 कोटी रुपयांची वसुली करण्याचं लक्ष्य
नवी दिल्ली: नीरव मोदीनं तब्बल 13 हजार कोटी बुडवल्यानं संकटात सापडलेल्या पंजाब नॅशनल बँकेनं आता कर्जवसुलीसाठी कंबर कसली आहे. पीएनबीनं कर्ज बुडवणाऱ्यांच्या विरोधात अनोखं अभियान सुरू केलं. या अभियानांतर्गत बँकेचे कर्मचारी गांधीगिरीच्या मार्गानं कर्जवसुली करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या पीएनबीचे कर्मचारी कर्जाची परतफेड न करणाऱ्यांच्या कार्यालयात फलक घेऊन बसतात. यामुळे पैसे बुडवणाऱ्यांना स्वत:ची लाज वाटेल आणि ते कर्जाची परतफेड करतील, अशी आशा पीएनबीला आहे. या माध्यमातून महिन्याकाठी 150 कोटी रुपयांच्या कर्जवसुलीचं लक्ष्य बँकेनं ठेवलं आहे.
'पीएनबी'चं मिशन गांधीगिरी अभियान एक वर्ष चालणार आहे. हिरे व्यापारी नीरव मोदीनं 13 हजार कोटींचं कर्ज बुडवल्यानं पीएनबीवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्यामुळेच आता बँकेनं कर्जवसुलीसाठी गांधीगिरी सुरू केली आहे. या अभियानांतर्गत बँक कर्मचाऱ्यांची टीम पैसे बुडवणाऱ्या व्यक्तीच्या घरी किंवा कार्यालयात जाऊन बसते. या टीमकडून कोणतीही घोषणाबाजी केली जात नाही. सध्या या गांधीगिरी अभियानात बँकेच्या 1,144 कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.
कर्जदारांशी चर्चा सुरू व्हावी, त्यातून दर महिन्याला 100 ते 150 कोटी रुपयांचं कर्ज वसूल व्हावं, यासाठी गांधीगिरी अभियान सुरू केल्याची माहिती बँकेनं प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. बँकेनं हेतुपुरस्पर कर्ज बुडवणाऱ्यांची यादी तयार केली असून त्यात 1,084 लोकांच्या नावांचा समावेश आहे. यातील 220 जणांचे फोटो बँकेनं वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले आहेत. कर्जाची परतफेड न करणाऱ्या 150 जणांचे पासपोर्ट गेल्या काही महिन्यांमध्ये जप्त करण्यात आले आहेत.