विषारी दारूकांड: २४ तासांत ३० मृतदेहांचे पोस्टमार्टेम करणाऱ्यांचेही डोळे पाणावले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 03:19 PM2022-12-16T15:19:20+5:302022-12-16T15:19:54+5:30
Poisonous liquor scandal: बिहारमध्ये विषारी दारू पिल्याने झालेल्या मृत्युंमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, विषारी दारू पिल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्याचे पोस्टमार्टेम करताना डॉक्टरही हेलावत आहेत.
पाटणा - बिहारमध्ये विषारी दारू पिल्याने झालेल्या मृत्युंमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, विषारी दारू पिल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्याचे पोस्टमार्टेम करताना डॉक्टरही हेलावत आहेत. पोस्टमार्टेम करण्यासाठी मृतदेहांचं विच्छेदन करणाऱ्या राजेश यांचाही भयावह अनुभव समोर आला आहे. राजेश यांनी २४ तासांत ३० मृतदेहांचे पोस्टमार्टेम केले असून, याबाबतचा भयावह अनुभव त्यांनी कथन केला आहे.
राजेश म्हणाले की, गेल्या ३ दिवसांपासून मी २४ तास ड्युटीवर आहे. जे मृतदेह येत आहेत. त्यांचे मी पोस्टमार्टेम करत आहे. राजेश सांगतात की, माझं काम मृतदेहांचं शवविच्छेदन करण्याचं आहे. त्यानंतर डॉक्टर निरीक्षण करून मृत्यूच्या खऱ्या कारणांचं परीक्षण करतात. तसे दररोज २४ मृतदेह येतात. मात्र यावेळी आधीचे सरळे आकडे मोडीत निघाले आहेत. २४ तासांमध्ये ३० मृतदेहांचं पोस्टमार्टेम करावं लागलं आहे.
आधी राजेश यांचे वडील हे काम करायचे. त्यांच्या मृत्यूनंतर राजेश यांनी हे काम सुरू केले. आतापर्यंत त्यांनी शेकडो लोकांच्या मृतदेहांचं पोस्टमार्टेम केलं आहे. मात्र यावेळी परिस्थिती अधिकच खराब असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा रुग्णालयात धडाधड मृतदेह येऊ लागले तेव्हा माझीही स्थिती खराब झाली. पण मी हिमतीने काम केले. तसेच मृतदेहांचे पोस्टमार्टेम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. सध्या मी २४ तास ड्युटीवर आहे. तसेच मला पोस्टमार्टेम रूममध्येच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बिहारमधील छपरा येथे विषाकी दारूमुळे आतापर्यंत ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण अजूनही आजारी आहेत. तसेच मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. तसेच अनेक रुग्ण छपरा आणि पाटणा येथे उपचार घेत आहेत.