'गब्बर को किस बात की मिली सजा'; पोलिसांच्या भन्नाट ट्वीटची चर्चा
By जयदीप दाभोळकर | Published: January 21, 2021 09:40 AM2021-01-21T09:40:29+5:302021-01-21T09:41:01+5:30
वाचा का केलंय पोलिसांनी ते भन्नाट ट्वीट
सध्या देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. याव्यतिरिक्त देशात आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणालाही सुरूवात झाली आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासनही लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत अशातच उत्तर प्रदेशपोलिसांनी कोरोनाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला एक क्लासिक चित्रपट शोलेमधील एका दृश्याची मदत घेतली आहे.
'गब्बर को किस बात की मिली सजा' असं कॅप्शन देत पोलिसांनी एक क्लिप शेअर केली आहे. यामध्ये अमजद खान यांनी साकारलेलं गब्बर हे पात्र उघड्यात थुंकताना दाखवलं आहे. तर या चित्रपटातील ठाकूर यांची भूमिका साकारणारे संजीव कुमार हे त्याला गळा दाबून पकडताना दाखवण्यात आलं आहे. व्हिडीओच्या अखेरिस एक संदेशही लिहिण्यात आला आहे. 'सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कोविड १९ चा प्रसार वाढू शकतो. हा एक गुन्हा आहे.'
गब्बर को मिली किस बात की सज़ा ? pic.twitter.com/3Dq5UkfIcK
— UP POLICE (@Uppolice) January 20, 2021
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचं हे भन्नाट ट्वीट अनेकांच्या पसंतीस उतरलं आहे. अनेकांनी त्यांच्या क्रिएटिव्हीटीची वाहवा केली आहे. त्यांना या ट्वीटला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि हजारो रिट्वीट्सही मिळाले आहेत.