वकिलांवर पोलिसांची कारवाई योग्यच
By admin | Published: February 26, 2016 03:48 AM2016-02-26T03:48:08+5:302016-02-26T03:48:08+5:30
पटियाला हाऊस कोर्टात पत्रकार, विद्यार्थी आणि कन्हैयाला मारहाण करण्याची घटना दुर्देवीच आहे. सरकारने आधीच त्याची निंदा केली आहे. मारहाण करणाऱ्या वकिलांवर पोलिसांनी
- विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पटियाला हाऊस कोर्टात पत्रकार, विद्यार्थी आणि कन्हैयाला मारहाण करण्याची घटना दुर्देवीच आहे. सरकारने आधीच त्याची निंदा केली आहे. मारहाण करणाऱ्या वकिलांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती योग्य व न्याय्य आहे. भारतीय दंड विधान व दंड संहितेनुसार त्यांच्या विरोधात जी कलमे पोलिसांनी लावली, ती योग्य की अयोग्य याचा निर्णय न्यायालयात होईल, असे उत्तर गृहमंत्री राजनाथ सिंगांनी राज्यसभेत दिले.
दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावर काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेचे उत्तर देतांना गृहमंत्री बोलत होते. गृहमंत्र्यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत काँग्रेस सदस्यांनी सरकारचा निषेध करीत सभात्याग केला.
मारहाण प्रकरणातील ३ वकील व भाजपचे आमदार ओ.पी.शर्मा यांच्याविरोधात विविध कलमांखाली दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, असे नमूद करून गृहमंत्री म्हणाले, मारहाणप्रकरणी नेमक्या कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करावा, हा अधिकार दिल्ली पोलीसांचा आहे. सदर प्रकरणाचा तपास अद्याप संपलेला नाही. कदाचित आणखी काही वकिलांच्या विरोधातही पोलीस कारवाई करू शकतात.
आझाद, त्यागी व या विषयावर आपली भूमिका मांडणाऱ्या अन्य वक्त्यांच्या आक्षेपांना उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले, दिल्ली देशाची राजधानी असल्यामुळे दिल्ली पोलिसांना अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या हाताळाव्या लागतात. तरीही सदर प्रकरणात अत्यंत प्रभावीरित्या दिल्ली पोलिसांनी आपली जबाबदारी हाताळली आहे. सर्वच प्रसंगात सर्वार्थाने निर्दोष पध्दतीने पोलीस कामकाज करतात असा दावा करता येत नाही.
प्रत्येक वेळी थोड्या फार सुधारणांची त्यात गरज असतेच. एनडीए सरकार सत्तेवर आल्यापासून सरकारने पोलीस दलाला प्रत्येक लहान मोठ्या गुन्ह्णांचे एफआयआर नोंदवण्याची सक्ती केली आहे. याधोरणामुळे दिल्लीत गुन्ह्णांची संख्या वाढलेली दिसते. याचा अर्थ राजधानीत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णत: ढासळली आहे, हा आरोप खरा नाही.
गृहमंत्र्यांच्या उत्तरावर विरोधी पक्षाचे सर्वच सदस्य प्रक्षुब्ध होते. सभागृहात संतापाचे वातावरण होते. त्यामुळेच गृहमंत्र्यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत विरोधकांनीही सभात्याग केला.
गृहमंत्र्यांच्या उत्तरावर जोरदार आक्षेप नोंदवत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले, मारहाण करणारे वकील व दिल्ली पोलीस यांचे संगनमत झाले होते, असा मुख्य आरोप आहे.
ज्यांना मारहाण झाली, त्यांना पोलिसांकडून या प्रकरणात न्याय मिळण्याची खात्री वाटत नाही. बनावट चित्रफितींच्या आधारे कन्हैयावर जे पोलीस देशद्रोहाचा खटला भरतात, त्याच पोलिसांनी मारहाण करणाऱ्या वकिलांचा पर्दाफाश करणाऱ्या खऱ्या चित्रफिती उपलब्ध असतांना, किरकोळ कलमे लावून त्यांना लगेच जामिनावर मुक्त केले. अशा पक्षपाती पोलीस यंत्रणेची बाजू घेउन गृहमंत्री उत्तर देत आहेत. ते आम्हाला कदापि मान्य नाही.
जद (यु)चे के.सी.त्यागी यांनी दिल्लीचे पोलीस साध्या वेषात जेएनयूमधे विद्यार्थीनींच्या वसतिगृहात राजरोसपणे घुसतात, त्यांना धमक्या देतात, या घटनेचे गृहमंत्री समर्थन करणार आहेत काय, असा सवाल केला.