पोलिसही साधूंच्या वेशात
By admin | Published: July 10, 2015 09:26 PM2015-07-10T21:26:19+5:302015-07-11T00:32:04+5:30
सिंहस्थ कुंभमेळा : कोणी तपोवनात तर कोणी रामकुंडावर फिरणार
सिंहस्थ कुंभमेळा : कोणी तपोवनात तर कोणी रामकुंडावर फिरणार
पंचवटी : दि. १० (संदीप झिरवाळ) सिंहस्थ कुंभमेळयातील बारिक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तसेच गोपनीय माहीती ठेवण्यासाठी नाशिक पोलीसही साधूमहंतांच्या वेशात दिसु लागले आहेत. डोक्याचे केस तसेच दाढी वाढलेले पोलीस कर्मचारी सिंहस्थ कुंभमेळयात घडणार्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणार आहेत. विशेष म्हणजे शहरातील काही पोलीस ठाण्यात काम करणार्या पोलीस कर्मचार्यांना साधूमहंतांचा पेहराव करून सिंहस्थ कुंभमेळयातील गोपनीय माहीतीसाठी नेमणूक करण्यात आल्याचे समजते.
सध्या चार पोलीस कर्मचारी साध्या वेशात कार्यरत असुन कोणी अमूक आखाडयाच्या साधू महंतांचे भक्त तर कोणी स्वत: साधू महंत म्हणून आगामी कालावधीत फिरणार आहे. तपोवन साधूग्राम तसेच रामकुंड परिसरात सुरू असलेल्या बारिक हालचालींवर लक्ष केंद्रीत करण्याची जबाबदारी या पोलीस कर्मचार्यांवर देण्यात आलेली आहे. सिंहस्थातील प्रमुख पर्वण्यांच्या कालावधीत तसेच गर्दीच्यावेळी हे पोलीस कर्मचारी हातात कमंडलू घेऊन तर कोणी साधूमहंतांप्रमाणेच अंगात भगवे वस्त्र परिधान करून गळयात व हातात तुळशीच्या माळा चढविणार आहेत. साधूमहंतांच्या वेशात असलेले हे पोलीस कर्मचारी साधूग्राममधील आखाडयांत सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळयात काही भोंदू साधू येण्याची शक्यता तर आहेच शिवाय काही गुन्हेगार देखिल साधूमहंतांच्या वेशात तपोवन साधूग्राममध्ये फिरण्याची शक्यता असल्याने त्यांना ओळखण्यासाठी तसेच भाविकांची सिंहस्थ कालावधीत होणारी फसवणूक थांबविण्यासाठी साधूंच्या वेशातील पोलीस कार्यरत राहणार आहेत.
गेल्या सिंहस्थ कुंभमेळयातही सिंहस्थातील हालचालींवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी पोलीस साधूमहंतांच्या वेशात कार्यरत होते. यावेळी होणार्या सिंहस्थ कुंभमेळयासाठी पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेतील तसेच पोलीस ठाण्यातील दहाहून अधिक कर्मचारी साधूमहंतांच्या वेशात फिरून तपोवन तसेच रामकुंडावरील घडणार्या घटनांची गोपनीय माहीती ठेवणार आहेत. (वार्ताहर)