जिथे झाला होता विकास दुबेचा एन्काऊंटर, तिथेच पलटली कुख्यात गुन्हेगारांची गाडी, ६ गुंड अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:35 AM2021-10-18T10:35:56+5:302021-10-18T10:44:32+5:30
Crime News: ज्याठिकाणी विकास दुबेची गाडी उलटली होती. तिथेच हत्या करून पळत असलेल्या सहा कुख्यात गुंडांची गाडीसुद्धा पलटी झाली. या गाडीमध्ये सहा गुंड होते.
लखनौ - गतवर्षी उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे याचा कार उलटल्यानंतर पोलिसांनी केलेला एन्काऊंटर हा वादाचा विषय ठरला होता. कानपूरमध्ये विकास दुबेची गाडी पलटणे आणि त्यानंतर त्याचा एन्काऊंटर होणे यावर विरोधी पक्षाकडून अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यादरम्यान, ज्याठिकाणी विकास दुबेची गाडी उलटली होती. तिथेच हत्या करून पळत असलेल्या सहा कुख्यात गुंडांची गाडीसुद्धा पलटी झाली. या गाडीमध्ये सहा गुंड होते.
ही गाडी पलटल्यानंतर या गुंडांचा पाठलाग करत असलेल्या पोलिसांनी गाडीत अडकलेल्या चार गुंडांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. तर पळत असलेल्या अन्य दोघांच्या पाठलाग करून मुसक्या आवळल्या. मात्र यावेळी गुंडांनी ना पोलिसांची बंदूक हिसकावली. ना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार हे कुख्यात गुंड शनिवारी रात्री उशिरा फजलगंजमध्ये आशिष नावाच्या एका तरुणाची हत्या केल्यानंतर पळून जात होते.
सीसीटीव्हीमध्ये हे गुंड आशिषला बोलावून घेऊन जाताना दिसत आहेत. त्याच आधारावर त्यांना पकडण्यात आले आहे. शनिवारी रात्री फजलगंज येथे राहणारे प्रांशू आणि आशू यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आशिषची हत्या केली होती. आशिषने आपल्या बहिणीला शिविगाळ केली होती. असा प्रांशूचा आरोप आहे. त्यामुळेच प्रांशूने रागाच्या भरात आशिषला घरी बोलावून मग गोळी मारून त्याची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिषवर गोळ्या झाडल्यानंतर हे गुंड एका इनोव्हा कारमधून दिल्लीत पळण्याच्या प्रयत्नात होते. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधून त्यांची ओळख पटवली. तसेच त्यांचा पाठलाग सुरू केला. बारा टोल प्लाझाच्या आधी त्यांनी पोलिसांना पाहिले आणि गाडीचा वेग वाढवला. त्यानंतर गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी पलटी झाली आणि हे सर्व आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले.