गर्लफ्रेंड्सचे लाड पुरवण्यासाठी गाड्यांची चोरी करणारा सुपरचोर अटक, पोलिसांना चकवा देण्यासाठी प्लास्टिक सर्जरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 12:48 PM2017-10-23T12:48:13+5:302017-10-23T12:53:53+5:30
एक हजारापेक्षाही जास्त चोरीच्या घटनांमध्ये सामील असणा-या सुपरचोराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना चकवा देण्यासाठी या चोराने प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र पोलिसांनी कारवाई करत दक्षिण दिल्लीमधून त्याला अटक केली आहे.
नवी दिल्ली - एक हजारापेक्षाही जास्त चोरीच्या घटनांमध्ये सामील असणा-या सुपरचोराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना चकवा देण्यासाठी या चोराने प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र पोलिसांनी कारवाई करत दक्षिण दिल्लीमधून त्याला अटक केली आहे. कुणाल असं या सुपरचोराचं नाव असून गेल्या 20 वर्षात एक हजाराहून जास्त चो-या त्याने केल्या आहेत.
पोलीस उपायुक्त रोमिल बानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचा रहिवासी असणा-या कुणालला दक्षिण दिल्लीमधील नेहरु प्लेस येथून अटक करण्यात आली. 13 ऑक्टोबर रोजी ही अटकेची कारवाई करण्यात आली. कुणालसोबत त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.
दिल्ली आणि जवळच्या परिसरामधील 62 कारचोरीच्या घटनांमध्ये कुणालचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 'आपला आणि आपल्या गर्लफ्रेंड्सचा खर्च भागवण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला होता', असं पोलिसांनी सांगितलं आहे. कुणालला अटक केल्यानंतर चौकशी केली असता, इरशाद अली आणि मोहम्मद शादाब यांची माहिती पोलिसांच्या हाती लागली. इरशाद अली आणि मोहम्मद शादाब चोरी झालेल्या कार विकत घेत असत. दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.
आपली ओळख बदलण्यासाठी आणि अटक टाळण्याच्या हेतूने कुणालने चार वर्षांपुर्वी प्लास्टिक सर्जरी करुन घेतली होती अशी माहिती पोलीस उपायुक्त रोमिल बानिया यांनी दिली आहे. पोलिसांनी चोरी झालेल्या 12 कार जप्त केल्या आहेत.
एकाच वेळी अनेक गर्लफ्रेंड्सचे लाड पुरवण्यासाठी कुणालने चोरी करण्यास सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्याने चोरी करायला सुरुवात केली. फेब्रुवारी 2017 मध्ये तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर सात महिन्यांतच त्याने दिल्लीतून शंभरपेक्षा जास्त कार चोरल्या आहेत. कुणालला याआधीही अनेकदा अटक झाली आहे. एकदा पोलीस कोठडीतून पळून जाण्यातही तो यशस्वी ठरला होता. अखेर कुणालसह दोन साथीदारांना जेरबंद करण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत.