केकमुळे मुलीचा मृत्यू; पोलिसांना सापडलं नाही दुकान, अखेर कुटुंबीयांनी 'असा' केला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 10:10 AM2024-04-01T10:10:49+5:302024-04-01T10:20:42+5:30

केक खाल्ल्यानंतर दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी बेकरी मालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

police arrested bakery employees after girl died due to eating cake in patiala | केकमुळे मुलीचा मृत्यू; पोलिसांना सापडलं नाही दुकान, अखेर कुटुंबीयांनी 'असा' केला पर्दाफाश

फोटो - आजतक

पंजाबच्या पटियाला येथे केक खाल्ल्यानंतर दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी बेकरी मालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. न्यू इंडिया बेकरीचे मॅनेजर रणजीत, कर्मचारी पवन आणि विजय यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ऑनलाइन फूड डिलिव्हरी एप झोमॅटोनेही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे आणि या फर्मला आपल्या लिस्टमधून काढून टाकलं आहे. या प्रकरणात मोठा फसवणूकही समोर आली आहे.

पटियालाच्या अमन नगर भागात राहणारी 10 वर्षांची मुलगी मानवी हिचा 24 मार्च रोजी वाढदिवस होता. यावेळी तिची आई काजलने झोमॅटोवर कान्हा फर्मकडून केक ऑर्डर केला होता. रात्री कुटुंबातील सर्वांनी केक खाऊन वाढदिवस साजरा केला. पण केक खाल्ल्यानंतर मानवीची तब्येत बिघडली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे उपचारादरम्यान मानवीचा मृत्यू झाला.

मानवीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी केक पाठवणाऱ्या कान्हा फर्मविरोधात तक्रार दाखल केली. मात्र चौकशी केली असता त्यांनी दिलेला पत्ता बनावट असल्याचं निष्पन्न झाले आणि तेथे असं कोणतंही दुकान नव्हतं. पोलिसांना केकचं दुकान सापडलच नाही. यानंतर, 30 मार्च रोजी मानवीच्या कुटुंबीयांनी झोमॅटोच्या माध्यमातून त्याच कान्हा फर्ममधून पुन्हा केक मागवला आणि डिलिव्हरी एजंट तो केक देण्यासाठी आला तेव्हा त्याला पकडलं.

डिलिव्हरी एजंटसह पोलीस देखील केक पाठवणाऱ्या दुकानात पोहोचले असता त्यांना कळले की कान्हा फर्म बनावट असून केक न्यू इंडिया बेकरीमधून पाठवण्यात आला होता. केकमुळे मुलीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी उरलेला केक तपासता यावा म्हणून फ्रीझरमध्ये ठेवला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू इंडिया बेकरीच्या मालकाने कान्हा फर्म नावाने दुसऱ्या बेकरीची नोंदणी केली होती आणि झोमॅटोवर डिलिव्हरी करण्यासाठी त्याच नावाचा वापर केला होता. या घटनेबाबत एसपी म्हणाले की, आरोपींविरुद्ध कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकरीच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. बेकरी मालक फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: police arrested bakery employees after girl died due to eating cake in patiala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.