अतिरेक्यांच्या हल्ल्यात काश्मिरात पोलीस शहीद, अतिरेक्याला पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:19 AM2017-11-18T00:19:43+5:302017-11-18T00:20:07+5:30
श्रीनगरच्या बाहेर झाकुरा भागात शुक्रवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक शहीद, तर दुसरा जखमी झाला. अतिरेकी कारमधून जात असताना त्यांनी श्रीनगर-गंडेबराल रस्त्यावर झाकुरा क्रॉसिंगजवळ पोलिसांच्या तुकडीवर हल्ला केला.
श्रीनगर : श्रीनगरच्या बाहेर झाकुरा भागात शुक्रवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक शहीद, तर दुसरा जखमी झाला. अतिरेकी कारमधून जात असताना त्यांनी श्रीनगर-गंडेबराल रस्त्यावर झाकुरा क्रॉसिंगजवळ पोलिसांच्या तुकडीवर हल्ला केला. यात इम्रान टाक हे पोलीस उपनिरीक्षक शहीद झाले, असे स्पेशल पोलीस अधिकाºयाने सांगितले. पोलिसांच्या तुकडीने ही कार अडवून एका अतिरेक्याला ताब्यात घेतले; पण दोघे पळून गेले.
अवघ्या आठवडाभरापूर्वी लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेत दाखल झालेला महाविद्यालयीन विद्यार्थी व फुटबॉलपटू माजीद अर्शीद याने सुरक्षा दलांपुढे शरणागती पत्करली, असे अधिकाºयांनी शुक्रवारी सांगितले. गुरुवारी रात्री अर्शीद दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षादलाच्या छावणीत शस्त्रे व दारूगोळ्यासह शरण आला. त्याला शरण येण्याचे आवाहन त्याच्या आई-वडिलांनी दूरदर्शनवर केले होते. अर्शीदचा जवळचा मित्र चकमकीत ठार झाल्यावर तो हिंसाचाराकडे ओढला गेला होता. (वृत्तसंस्था)
जवान जखमी-
पंूछ आणि जम्मू जिल्ह्यांत नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी युद्धविरामाचे उल्लंघन करून केलेला तोफमारा व गोळीबारात लष्कराचा जवान जखमी झाला. भारतानेही या माºयाला तेवढ्याच जोरदारपणे उत्तर दिले. पाकिस्तानकडून युद्धविरामाचे शुक्रवारी झालेले हे सलग तिसरे उल्लंघन आहे. पाकिस्तानकडून सकाळी ७.४५ वाजता पूंछ सेक्टरमध्ये कोणतेही कारण नसताना छोट्या स्वयंचलित शस्त्रांतून बेछूट गोळीबार सुरू झाला.