प्रख्यात शायर मुनव्वर राणा यांच्या घरात मध्यरात्री घुसले पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 11:56 AM2021-07-03T11:56:52+5:302021-07-03T12:07:12+5:30
नुकतेच मध्यरात्री पोलीस अचानक घरात घुसले व त्यांनी तेथील छोट्याशा ग्रंथालयात काही गोष्टींचा शोध घेतला. तोपर्यंत मुनव्वर राणा यांना घराच्या बाहेर बसविण्यात आले होते.
लखनऊ : प्रख्यात कवी मुनव्वर राणा यांच्या घरात मध्यरात्री उत्तर प्रदेशचे पोलीस घुसले. वॉरंटविनाच तपासासाठी आलेल्या पोलिसांनी राणा कुटुंबीयांना अनेक प्रश्न विचारले. तसेच साऱ्या घराची झडती घेतली. पण कोणत्या कारणापायी ही कारवाई सुरू आहे याची माहिती देणे पोलिसांनी टाळले. राणा कुटुंबातील महिलांशी पोलिसांनी गैरव्यवहार केल्याचा आरोपही झाला आहे. मुनव्वर राणा यांची मुलगी व काँग्रेस नेता फौजिया राणा हिने या प्रकाराबद्दल एक व्हिडिओ फीत जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की, मुनव्वर राणा आजारी असून त्यांनाही त्रास देण्यात येत आहे. प्रशासन आमच्यावर सूड उगवत आहे. नुकतेच मध्यरात्री पोलीस अचानक घरात घुसले व त्यांनी तेथील छोट्याशा ग्रंथालयात काही गोष्टींचा शोध घेतला. तोपर्यंत मुनव्वर राणा यांना घराच्या बाहेर बसविण्यात आले होते.
उत्तर प्रदेश पोलिसांनी फौजिया राणा यांच्या १६ वर्षे वयाच्या मुलीचा मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलमध्ये त्या मुलीच्या वैयक्तिक गोष्टींची नोंद आहे. असे असताना पोलीस हा मोबाईल आपल्यासोबत कसा काय घेऊन जाऊ शकतात? असा सवाल फौजिया यांनी विचारला. कवी मुनव्वर राणा यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी गुंडगिरी सुरू केली आहे. पोलिसांना माझ्यावर काही आक्षेप नव्हता. ते माझ्या मुलाबाबत पुरावे शोधण्यासाठी आल्याचे पोलिसांच्या बोलण्यातून कळले. घराची झडती घेत असताना पोलिसांनी वकिलांना, पत्रकारांना तिथे येऊ दिले नाही.
कविवर्यांच्या मुलावर झाला होता गोळीबार
मुनव्वर राणा यांचा पुत्र तरबेज यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. या हल्ल्यातून तरबेज सुदैवाने बचावले, पण हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या त्यांच्या गाडीत घुसल्या होत्या. या घटनेनंतर पळून गेलेल्या हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत.