पोलिस ड्रग्स जाळतात की गायीचे शेण - सुप्रीम कोर्टाचा खोचक सवाल
By Admin | Published: August 31, 2015 03:52 PM2015-08-31T15:52:01+5:302015-08-31T15:52:01+5:30
जप्त केलेल्या अंमली पदार्थांची पोलिसच विक्री करत असल्याचा संशय व्यक्त करत पोलिस अंमली पदार्थ जाळतात की गायीचे शेण असा खोचक सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - जप्त केलेल्या अंमली पदार्थांची पोलिसच विक्री करत असल्याचा संशय व्यक्त करत पोलिस अंमली पदार्थ जाळतात की गायीचे शेण असा खोचक सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे. विद्यमान व्यवस्थेत जप्त केलेले अंमली पदार्थ ठेवण्यासाठी व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्पष्ट नियमावली नसल्याचे ताशेरेही कोर्टाने केंद्र व राज्य सरकारवर ओढले आहेत.
अंमली पदार्थ नष्ट करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. देशात जप्त झालेल्या अंमली पदार्थांपैकी अवघ्या ५ ते १० टक्के अंमली पदार्थच नष्ट केले जातात अशी माहिती कोर्टात देण्यात आली. यानंतर सुप्रीम कोर्टाने पोलिसांसोबतच केंद्र व राज्य सरकारला खडे बोल सुनावले. ४० कोटी, ५० कोटींचे अंमली पदार्थ जप्त केल्याचा दावा पोलिस करतात, पण हे अंमली पदार्थ शेवटी जातात कुठे, पुरावा म्हणून कोर्टात अंमली पदार्थांचे नमुन दिले जातात, मग उर्वरित अंमली पदार्थाचे काय होते, पोलिस खरंच अंमली पदार्थ जाळतात की गायीचे शेण जाळतात असे असंख्य प्रश्नच कोर्टाने उपस्थित केले. पोलिस दलातील हवालदार, कॉन्स्टेबल, शिपाई या सारख्या कनिष्ठ पदावरील कर्मचारीच हे अंमली पदार्थ पुन्हा बाजारात विकत असल्याच्या घटना घडल्या आहेत याकडेही कोर्टाने लक्ष वेधले. पोलिसांच्या मालखान्याचीही दुरावस्था झाल्याने जप्त केलेला माल सुरक्षित कसा राहणार असा सवालही कोर्टाने उपस्थित केला.