लष्कराचा अपमान करणा-या आझम खानविरोधात पोलीस तक्रार
By admin | Published: June 30, 2017 11:02 AM2017-06-30T11:02:41+5:302017-06-30T11:02:41+5:30
भारतीय लष्कर जवानांचा अपमान करणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 30 - भारतीय लष्कर जवानांचा अपमान करणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. आझम खान यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर दोन वेगवेगळ्या पोलीस तक्रारी झाल्या आहेत. हजरतगंज आणि गौतमपल्ली पोलीस ठाण्यात या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आझम खान यांनी भारतीय लष्कराच्या जवानांवर बलात्काराचा आरोप करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी होऊ लागली होती.
जानकी शरण पांडे यांनी हजरतगंज पोलीस ठाण्यात आझम खान यांच्याविरोधात तक्रार केली आहे. आझम खान यांच्या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात लोकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. हिंदू जागरण मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तर आझम खान यांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त केला. तसंच त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणीही केली. अशाच प्रकारचं आंदोलन जौनपूर, मथुरा आणि लखीमपूर खेरी येथेही करण्यात आलं.
"महिला दहशतवादी लष्कर जवानांचं गुप्तांग कापून सोबत घेऊन जात आहेत. हात किंवा मुंडक न कापता शरिरातील ज्या भागासंबंधी त्यांची तक्रार होती तोच भाग कापून ते घेऊन गेले. त्यांनी एक मोठा संदेश दिला असून संपुर्ण हिंदुस्थानाला याची लाज वाटली पाहिजे. आपण जगाला काय चेहरा दाखवणार आहोत याचाही विचार केला पाहिजे". आझम खान यांचा एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये ते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत होते.
मी भाजपाची आयटम गर्ल आहे, ते इतर कोणाबद्दल बोलत नाहीत. त्यांनी सर्व लक्ष माझ्यावर केंद्रीत करुनच उत्तरप्रदेशात निवडणूक लढवल्या असं आझम खान बोलले होते. स्पष्टीकरण देताना आझम खान म्हणाले की, मीडियाने माझ्या विधानांचा विपर्यास करुन चुकीचा अर्थ लावला. माझ्यामुळे लष्कराच्या मनोधैर्य कसे खचू शकते? पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात गेले तेव्हा लष्कराच्या मनोधैर्यावर परिणाम झाला.
याआधीही केली आहेत वादग्रस्त वक्तव्य -
आझम खान यांनी अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ताज्या घटनेबद्दल बोलायचं झाल्यास बुलंदशहर सामूहिक बलात्कारावर त्यांनी केलेलं वक्तव्य. या सामूहिक बलात्काराला त्यांनी एक राजकीय षडयंत्र म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा त्यांच्या या वक्तव्याचं उत्तर मागितलं, तेव्हा मात्र आपल्या वक्तव्याच्या विपर्यास केल्याची पळवाट त्यांनी काढली. नंतर त्यांनी विनाअट माफीदेखील मागितली. न्यायालयाने त्यांचा हा माफीनामा स्विकार केला होता.
आझम खान यांच्या वक्तव्याच्या समाचार घेताना स्वामी म्हणाले, "आझम खानसारख्या लोकांना चर्चेत राहायचे असते. असे लोक मुस्लिम समाजालाही फसवत असतात. आझम खान नेहमीच अशी वाह्यात वक्तवे करत असतात. त्यांना भारतात ज्या प्रकारच्या लोकशाहीची मजा घेता येते तशी कुठल्या मुस्लिम देशात घेता आली नसती. त्यांनी कुठल्याही मुस्लिम देशात असे वक्तव्य केले असते तर त्यांचा शिरच्छेद केला गेला असता, किंवा त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्यात आले असते."
पक्षाने मात्र आझम खान यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली होती. ""नाजूक परिस्थिती असताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं असून आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो"", असं समाजवादी पक्षाच्या दिपक मिश्रा यांनी सांगितलं होतं. भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणा-या राजकारण्यांवर बहिष्कार टाकला पाहिजे असं म्हटलं होतं. तर भाजपाचे अजून एक प्रवक्ता जीव्हीएल नरसिम्हा यांनी आझम खान फुटीरवादी आणि दहशतवाद्यांसाठी बोलत असल्याचं म्हटलं होतं. नरसिम्हा यांनी सांगितल्यानुसार, अशा प्रकारची वक्तव्यं करण्यासाठी समाजवादी पक्षच आपल्या नेत्यांना उकसवत असतो.