पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 13:41 IST2024-05-13T13:39:36+5:302024-05-13T13:41:31+5:30
Marriage News: लग्नाची तयारी सुरू असताना पोलीस काँन्स्टेबल नवरदेवाला त्याच्या प्रेयसीने भर मंडपातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा नवरदेव प्रेयसीला अंधारात ठेवून दुसऱ्याच एका तरुणीसोबत विवाह करण्याच्या तयारीत होता.

पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
लग्नाची तयारी सुरू असताना पोलीस काँन्स्टेबल नवरदेवाला त्याच्या प्रेयसीने भर मंडपातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा नवरदेव प्रेयसीला अंधारात ठेवून दुसऱ्याच एका तरुणीसोबत विवाह करण्याच्या तयारीत होता. मात्र त्याच्या प्रेयसीने फिल्मी स्टाईलमध्ये एंट्री घेत त्याचा डाव हाणून पाडला. ही घटना छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार १० मे रोजी कांकेरमधील एका गावात वरात आली होती. संपूर्ण कुटुंब लग्नाच्या आनंदात होतं. तेवढ्यात एक तरुणी तिथे पोहोचली. तिने वराचं थेट अपहरण केलं. अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिथे उपस्थित असलेल्या वधूच्या नातेवाईकांनी या तरुणीला कारण विचारलं असता तिने जे सांगितलं ते ऐकून उपस्थितांना धक्का बसला.
या तरुणीने सांगितले की, लग्नासाठी आलेल्या नवरदेवासोबत तीन वर्षांपूर्वी तिची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. त्यानंतर या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं होतं. या तरुणाने तिला लग्नाचं वचनही दिलं होतं. मात्र हा तरुण कांकेरमध्ये दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न करत असल्याची खबर तिला मिळाली. हे सर्व समोर येताच लग्न थांबण्यात आलं. तसेच वधू आणि वर पक्षांमध्ये रात्रभर बैठक सुरू होती.
सकाळपर्यंत या प्रकरणावरून गावात तणावाचे वातावरण होते. अखेर वर पक्षाची चूक असल्याने हे सारे घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानंतर लग्न मोडण्यात आले. तसेच वर पक्षाला वधू पक्षाचा झालेला खर्च परत देण्यास सांगण्यात आले. वर पक्षाकडून वधू पक्षाला आश्वासन मिळाल्यानंतर वरात परत पाठवण्यात आली. तसेच वराच्या प्रेयसीलाही माघारी पाठवण्यात आले. मात्र याबाबत पोलिसांकडे कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही.