सोनभद्रमधील पीडितांना भेटू इच्छिणाऱ्या प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 06:40 AM2019-07-20T06:40:07+5:302019-07-20T06:40:24+5:30
उत्तर प्रदेशमधील सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून घडलेल्या हिंसाचारात १० जण ठार झाले होते.
लखनौ : उत्तर प्रदेशमधील सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून घडलेल्या हिंसाचारात १० जण ठार झाले होते. तेथील पीडितांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांनी शुक्रवारी नारायणपूर येथे रोखून पुढे जाण्यास मनाई केली. तरीही आपला निर्धार कायम राखलेल्या प्रियांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईच्या निषेधार्थ प्रियांका यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच ठाण मांडून धरणे धरले होते.
सोनभद्रमधील हिंसाचारावरून उत्तर प्रदेशचे राजकारण तापले आहे. या प्रकरणी खूप गहजब झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी व अन्य चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत, तसेच सरपंच यज्ञ दत्त, त्याचा भाऊ व अन्य २९ जणांना अटक करण्यात आली आहे.
सोनभद्रमधील हिंसाचारात जखमी झालेल्यांची वाराणसी येथील बीएचयू ट्रॉमा सेंटर रुग्णालयात जाऊन प्रियांका गांधींनी विचारपूस केली. त्यानंतर, त्या सोनभद्रला जायला निघाल्या असताना त्यांना वाटेत पोलिसांनी अडवून चुनार येथील गेस्ट हाउसला घेऊन गेले. मात्र, या गेस्ट हाउसची वीज कापण्यात आली. त्यानंतर, पाणीही बंद करण्यात आले. काही काळ उकाड्यातच तेथे काढल्यावर प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यातच ठाण मांडून धरणे धरले व पोलीस व योगी सरकारचा निषेध केला. प्रियांका गांधी म्हणाल्या की, सोनभद्रला माझ्या मुलाच्या वयाच्या एकाला गोळ्या घालून जखमी करण्यात आले. आता तो रुग्णालयात उपचार घेत आहे. तिथे गोळ््या घालून ठार मारण्यात आलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मला भेटायचे होते. त्यांना भेटण्यापासून मला कोणत्या कायद्याच्या आधारे रोखण्यात आले असा संतप्त सवालही प्रियांका गांधी यांनी विचारला. चुनार गेस्ट हाऊस येथून प्रियांका गांधी नंतर दिल्लीला परत गेल्या.
असुरक्षिततेच्या भावनेतून केली कारवाई : राहुल गांधी
उत्तर प्रदेश सरकारने प्रियांका गांधी यांना बेकायदेशीररित्या अटक केली असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. असुरक्षिततेच्या भावनेतून योगी आदित्यनाथ सरकारने आपल्या हाती असलेल्या अधिकारांचा मनमानी वापर केल्याचे ते म्हणाले.