पोलिसांची ड्युटी आठ तासांपेक्षा अधिक नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 05:08 AM2018-05-17T05:08:23+5:302018-05-17T05:08:23+5:30
पोलिसांच्या कामाची वेळ आठ तासांपेक्षा जास्त असू नये, असे आदेश उत्तराखंड हायकोर्टाने मंगळवारी राज्य सरकारला दिले.
नैनिताल : पोलिसांच्या कामाची वेळ आठ तासांपेक्षा जास्त असू नये, असे आदेश उत्तराखंड हायकोर्टाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. अत्यंत जिकिरीचे काम करणाऱ्या पोलिसांना अतिरिक्त वेतन मिळाले पाहिजे, असेही कोर्टाने म्हटले आहे.
हरिद्वार जिल्ह्यातील अॅड. अरुणकुमार भदुरिया यांनी केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणीच्या वेळी खंडपीठाने हे आदेश दिले. खडतर कामाची जबाबदारी असणाºया पोलिसांना ४५ दिवसांचे अतिरिक्त वेतन मिळावे, यासाठी सरकारने पावले उचलावीत. पोलिसांना त्यांच्या कार्यकाळात किमान तीन वेळा तरी बढती मिळायला हवी, त्यांच्यासाठी सरकारने घरेही बांधून द्यायला हवीत. पोलिसांना रजा मंजूर करताना त्यांच्या वरिष्ठांनी उदार दृष्टिकोन बाळगला पाहिजे. एखादा पोलीस कामावर असताना जखमी झाला वा मरण पावल्यास त्याच्या कुटुंबीयांना योग्य ती भरपाई दिली पाहिजे. पोलिसांची दर तीन महिन्यांनी वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. त्यासाठी डॉक्टर व मानसोपचारतज्ज्ञांची पोलीस दलात विशेष भरती करण्यात यावी. पोलीस ठाण्याच्या ठिकाणी व्यायामशाळा, तरणतलाव अशा सुविधा असाव्यात, असेही खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)