पोलिस चकमकीत २० चंदन तस्कर ठार
By admin | Published: April 7, 2015 11:44 AM2015-04-07T11:44:14+5:302015-04-07T11:48:51+5:30
आंध्रप्रदेशमधील तिरुपतीजवळ चंदन तस्करी करणारी टोळी व पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीत २० चंदन तस्कर ठार झाले आहेत.
ऑनलाइन लोकमत
हैद्राबाद, दि. ७ - आंध्रप्रदेशमधील तिरुपतीजवळ चंदन तस्करी करणारी टोळी व पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीत २० चंदन तस्कर ठार झाले आहेत. तर तेलंगणमध्येही पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करणा-या पाच कैद्यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. मृतांमध्ये सिमी संघटनेच्या सक्रीय सदस्याचाही समावेश आहे.
मंगळवारी सकाळी तिरुपतीजवळील चित्तूर येथे चंदन तस्करांविरोधात स्थानिक पोलिस व वन विभागाने मोहीम राबवली. या मोहीमेदरम्यान चंदन तस्कर व पोलिसांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सुमारे २० चंदनतस्करांचा मृत्यू झाला आहे. चित्तूरमधील घनदाट जंगलात अजूनही चकमक सुरु असल्याचे स्थानिक पोलिस अधिका-यांनी सांगितले.
तेलंगणमध्येही मंगळवारी सकाळी पोलिस चकमकीत पाच कैद्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी वारांगल जिल्ह्यातील पाच कैद्यांना सुनावणीसाठी न्यायालयात नेले जात होते. या दरम्यान कैद्यांनी पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. कैद्यांचा पाठलाग करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला व यात पाचही कैद्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सिमीचा सक्रीय सदस्य विकरुद्दीन अहमदचाही समावेश आहे.