मथुरेत पोलिसांवरच जमावाचा गोळीबार, अनेक पोलीस जखमी
By admin | Published: June 2, 2016 08:38 PM2016-06-02T20:38:18+5:302016-06-02T20:47:18+5:30
मथुरेमध्ये सरकारी जमिनीवर बांधलेलं अवैध बांधकाम हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच काही लोकांनी गोळीबार केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
उत्तर प्रदेश, दि. 2 - मथुरेमध्ये सरकारी जमिनीवर बांधलेलं अवैध बांधकाम हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच काही लोकांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात एसएचओ संतोष यादव यांचा मृत्यू झाला असून, एसपीसह अनेक पोलीस या गोळीबारात जखमी झाले आहेत. परिसरात भयंकर स्फोट झाला असून, जिल्ह्यातून पोलीस बळ मागवण्यात आलं आहे. या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
दोन्ही बाजूंनी अंदाधुंद गोळीबार झाल्यानं आजूबाजूचा परिसर रिकामी करण्यात आला आहे. जवाहर बागच्या 280 एकरमध्ये मोठ्या प्रमाणात आग पसरली आहे. हल्लेखोरांनी पोलिसांवर गावठी बॉम्ब आणि हातगोळे फेकले आहेत. हल्लेखोरांनी 4 ते 5 पोलिसांनाही ओढत नेलं आहे. तर हल्ल्यात एसपी मुकुल द्विवेदी, मॅजिस्ट्रेट राम यादवसह काही पोलीस जखमी झाले आहेत. मथुरा प्रशासनानं जवाहर बागमधील अवैध बांधकाम केलेल्यांना घरं खाली करण्यास सांगितलं होतं. मात्र याविरोधात जमावानं पोलिसांविरोधातच एल्गार पुकारून त्यांच्यावर हल्ला केला. हायकोर्टाच्या निर्देशानुसार पोलिसांनी जवाहरबाग खाली करण्यास लोकांना सांगितलं होतं. मात्र आंदोलकांनी पोलिसांवरच हल्ला केला आहे.