पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 07:07 IST2024-05-21T07:05:24+5:302024-05-21T07:07:50+5:30
पोलिस महासंचालक विकास सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही जण कोलंबोहून चेन्नईमार्गे अहमदाबादला आले होते. इस्लामिक स्टेटच्या आदेशानुसार, अतिरेकी कारवाई करण्यासाठी ते भारतात आले होते. त्यांच्याकडून जप्त केलेले मोबाईल व अन्य साहित्यातून त्याची पुष्टीही झाली.

पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
अहमदाबाद : येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून इस्लामिक स्टेटच्या चार दहशतवाद्यांना गुजरात पोलिसांच्या एटीएसने सोमवारी अटक केली. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी श्रीलंकन नागरिक असून, ते इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात राजकोट येथून एटीएसने अल-कायदाशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. मोहम्मद नुसरत, मोहम्मद फारूख, मोहम्मद नफरान व मोहम्मद रासदीन अशी त्यांची नावे आहेत.
पोलिस महासंचालक विकास सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही जण कोलंबोहून चेन्नईमार्गे अहमदाबादला आले होते. इस्लामिक स्टेटच्या आदेशानुसार, अतिरेकी कारवाई करण्यासाठी ते भारतात आले होते. त्यांच्याकडून जप्त केलेले मोबाईल व अन्य साहित्यातून त्याची पुष्टीही झाली.
देशात आत्मघाती हल्ल्याची होती तयारी
- अटक केलेले चारही आरोपी काही दिवस पाकिस्तानमध्ये राहिले आहेत. तिथून ते श्रीलंकन कट्टरपथीय नेत्यांच्या संपर्कात होते.
- सोशल मीडियाद्वारेही ते इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीचा प्रचार-प्रसार करत होते. भारतात आत्मघाती हल्ला करण्याचीही त्यांची तयारी होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.