दारू माफियांविरोधात कारवाई करणा-या पोलिसांची गाडीच कंटेनरनं उडवली, 5 पोलिसांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 01:14 PM2017-09-11T13:14:56+5:302017-09-11T13:24:35+5:30
बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात पोलीस कर्मचा-यांच्या गाडीवर कंटेनर चालवण्यात आल्याने 5 पोलिसांचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन पोलीस अधिका-यसहीत एकूण 4 जण गंभीर जखमी झालेत.
मुझफ्फरपूर, दि. 11 - बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात पोलीस कर्मचा-यांच्या गाडीवर भरधाव कंटेनर चालवण्यात आल्याने 5 पोलिसांचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन पोलीस अधिका-यांसहीत एकूण 4 जण गंभीर जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी पोलिसांचं पथक अवैध दारूमाफियांविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत होते. यावेळी भरधाव येणा-या कंटेनरनं या पोलिसांच्या गाडीला उडवले. ही धक्कादायक घटना रविवारी उशीरा रात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेत जखमी झालेले डीएम धर्मेंद्र सिंह आणि एसएसपी विवेक कुमार बैरिया यांनी जवळील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिचरा परिसरातून मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेल्या चालकानं पोलिसांनी माहिती दिली की, दारूमाफिया अकुराहां ढाला याच परिसरातून प्रवास करणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस उप-अधीक्षक कृष्ण मुरारी प्रसाद यांच्या नेतृत्वात पोलीस प्रत्येक वाहनांची तपासणी करत होते. यादरम्यान, समोरुन एक कंटेनर भरधाव येत असल्याचे दिसले. पोलिसांनी कंटेनर चालकाला थांबण्याचा इशारा केला. तर कंटेनर थांबवण्याऐवजी गती वाढवून चालकानं भरधाव कंटेनरनं पोलिसांची गाडीच उडवली. मृतांमध्ये एक हवालदार, तीन शिपाई आणि पोलिसांच्या गाडीचालकाचा समावेश आहे. विश्व मोहन शर्मा, विजय चौधरी, मुन्ना चौधरी, फरमान अंसारी अशी मृतांची नावं आहेत.
बिहारमध्ये दारूबंदी
दरम्यान, 2016 मध्ये 1 एप्रिलपासून बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्यात आली आहे. देशी बनावटीच्या परदेशी दारूसह सर्व प्रकारच्या दारू विक्रीवर येथे बंद घालण्यात आली आहे. सरकारने 1 एप्रिलला ग्रामीण भागात देशी व इतर दारूवर बंदी घातली होती. यावेळी गावं व शहरात परदेशी दारूच्या विक्रीला परवानगी कायम ठेवली होती. परंतु दारूबंदी निर्णयाला राज्यातील जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने दारूवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
Five including four policemen on duty killed after a truck ran over them in Bihar's Muzaffarpur in early morning hours; two cops injured.
— ANI (@ANI) September 11, 2017