गुन्हेगारांना गोळ्या घातल्यावर पोलीसांना मिळतो विवाहसौख्याचा आनंद - राजनाथ सिंह
By admin | Published: September 3, 2014 08:11 PM2014-09-03T20:11:44+5:302014-09-03T20:16:19+5:30
गुन्हेगारांना ठार केल्यानंतर पोलीसांना लग्न केल्याचा आनंद मिळतो असे उद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पोलीसांना बनावट चकमकीत गुन्हेगारांना ठार करण्याचा परवानाच दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. ३ - गुन्हेगारांना ठार केल्यानंतर पोलीसांना लग्न केल्याचा आनंद मिळतो असे उद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पोलीसांना बनावट चकमकीत गुन्हेगारांना ठार करण्याचा परवानाच दिला आहे. जयपूर येथे देशभरातील पोलीस अधिका-यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात गृहमंत्र्यांनी ही मुक्ताफळे उधळली असून पोलीसांच्या तोंडी असलेल्या शिव्या वेदवाक्य असल्याचं प्रमाणपत्रही त्यांनी बहाल केलंय.
मंगळवारी देशभरातून पोलीस अधिकारी प्रशिक्षण शिबिरासाठी जयपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांना राजनाथसिंह यांनी मार्गदर्शन केले. पोलीसांना प्रेरणा देण्याच्या भरात राजनाथ सिंह म्हणाले की जंगलांमध्ये अपराध्यांचा पाठलाग करताना पोलीसांनी त्यांना ठार मारले तर त्यांना लग्नापेक्षा जास्त आनंद होतो. त्यांनी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतानाचा आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले, पोलीस अधिकारी नक्षलवाद्यांकडून मारले जात होते, त्यावेळी मी त्यांना सांगितले की तुम्ही विरोधी पक्ष व मानवाधिकारी संस्थांची चिंता करू नका, त्यांना मी बघून घेईन. त्यावेळी आपल्याला मानवाधिकारांच्या उल्लंघनाबद्दल जे वाटतं तेच आजही वाटतं असं सांगत मानवाधिकारांच्या उल्लंघाची चिंता न करता गुन्हेगारांना गोळ्या घाला असाच संदेश दिला आहे.