घरात शौचालय नसल्याने महिलेची सासरच्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 12:53 PM2017-10-02T12:53:11+5:302017-10-02T12:56:41+5:30
घरात शौचालय नसल्याने महिलेने सासरच्या लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याची घटना घडली आहे. शौचालय नसल्याने अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचं सागंत महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पाटणा - घरात शौचालय नसल्याने महिलेने सासरच्या लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याची घटना घडली आहे. शौचालय नसल्याने अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचं सागंत महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करत आपल्या सास-यांनी घरात लवकरच शौचालय बांधलं जाईल असं शपथपत्र द्यावं अशी मागणी केली आहे.
महिलेने 25 सप्टेंबर रोजी आपल्या सासरी शौचालय नसल्याची लेखी तक्रार दिली असल्याची माहिती मुझफ्फरपूरमधील महिला पोलीस ठाण्याच्या अधिकारी ज्योती यांनी सांगितलं आहे. अनेकदा सास-यांकडे मागणी करुनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं असा दावा महिलेने केला आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनंतर 26 सप्टेंबर रोजी दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं.
सास-यांनी दिलं लेखी आश्वासन
यानंतर दोन्ही पक्ष पोलीस ठाण्यात हजर झाले होते. यावेळी महिलेच्या सास-यांनी लेखी आश्वासन देत लवकरच घरात शौचालय बांधू असा शब्द दिला आहे. पोलिसांनी एका आठवड्यात शौचालयाचं काम पुर्ण करण्यास सांगितलं होतं. मात्र महिलेच्या सासरमधील लोकांनी आपल्याला अजून थोडा वेळ दिला जावा अशी विनंती केली. शौचालय बांधण्यासाठी पैसे जमा करावे लागतील, त्यासाठी वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.
हागणदारीमुक्त योजनेत मुंबई शेवटून तिसरी, पुणे नंबर वन, सोलापूर शेवटच्या क्रमांकावर
ओडीएफ (हागणदारीमुक्त) शहरांच्या यादीत पुणे महापालिकेने ५३,४२१ शौचालये बांधून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे, तर केवळ १,२३८ शौचालये बांधणारी मुंबई महापालिका शेवटून तिस-या क्रमांकावर आहे. रायगड जिल्ह्याने १२० टक्के उद्दिष्ट पूर्ण करून पहिला तर सोलापूर जिल्ह्याने ६७ टक्के काम करून शेवटचा क्रमांक मिळवला आहे.