जेएनयूमध्ये पोलिसांना बंदी
By admin | Published: February 23, 2016 03:36 AM2016-02-23T03:36:52+5:302016-02-23T03:36:52+5:30
देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेले जेएनयूचे पाच विद्यार्थी रविवारी रात्री उशिरा विद्यापीठात परतले असून, उमर खालिदचाही त्यात समावेश आहे. जमावाकडून मारहाण
नवी दिल्ली : देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेले जेएनयूचे पाच विद्यार्थी रविवारी रात्री उशिरा विद्यापीठात परतले असून, उमर खालिदचाही त्यात समावेश आहे. जमावाकडून मारहाण होण्याच्या भीतीने हे विद्यार्थी गेल्या १० दिवसांपासून दडून बसले होते. विद्यापीठ परिसरात वातावरण सुरळीत होत असल्यामुळे ते परतले. पोलिसांना विद्यापीठात प्रवेश दिला जाणार नाही, असे आश्वासन कुलगुरूंनी विद्यापीठातील शिक्षक संघटनेला दिले आहे. पोलीस आतमध्ये गेलेले नाहीत. मात्र आरोपी विद्यार्थी निरपराध असतील तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे, निरपराध असल्याचे पुरावे सादर करीत त्यांनी तपासात सहभागी व्हावे, असे आवाहन दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी केले आहे.
त्या पाचही जणांना अटक करण्यासाठी पोलीस काल विद्यापीठापर्यंत पोहोचले. मात्र विद्यापीठ प्रशासनाच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही, असे तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे आज सकाळपर्यंत पोलीस तिथेच होते. कुलगुरूंशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र आजही उशिरापर्यंत पोलीस विद्यापीठात गेले नव्हते.
या विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिलेल्या नसल्यामुळे त्यांच्या बाजूने विद्यापीठाने भूमिका घ्यावी, पोलिसांना विद्यापीठाच्या आवारात घुसू देऊ नये, अशी मागणी विद्यार्थी संघटना आणि शिक्षकांनी सोमवारी सकाळी कुलगुरूंकडे केली होती.
अतिरेकी नाही; पाकला गेलो नाही
काल विद्यापीठात परतल्यानंतर उमर खालिदने म्हटले की, मी अतिरेकी नाही, गेल्या १० दिवसांत ज्या पद्धतीने माझी मीडिया ट्रायल झाली, त्यामुळे माझ्या कुटुंबावर काय बेतले, याची मला कल्पना आहे. माझ्याकडे पासपोर्ट नसल्याने मी पाकिस्तान वा अफगाणिस्तानात गेल्याचे वृत्त चुकीचे आहे. कार्यक्रमापूर्वी आखात वा काश्मीरमध्ये मी ८00 कॉल केल्याचा आरोपही खोटा आहे. अशी विधाने त्याने विद्यार्थ्यांसमोरील भाषणात केली. हे पाचही विद्यार्थी कालपासून प्रशासकीय कक्षात अन्य विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत बसले आहेत.
विद्यापीठाने भूमिका घ्यावी
विद्यापीठाच्या अंतर्गत यंत्रणेने चौकशी समितीची पुनर्रचना केल्यानंतरच कामाला मुभा द्यावी. विद्यार्थ्यांनी या समितीसमक्ष हजर व्हावे यासाठी प्रशासनाने योग्य वातावरण तयार करावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत, असे जेएनयूच्या शिक्षक संघटनेने (जेन्यूटा) तातडीने बोलाविलेल्या बैठकीत पारित केलेल्या ठरावात म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप लावले जाऊ शकत नाहीत, असे मत कायदेतज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांवरील हे आरोप वगळण्याची भूमिका विद्यापीठाने घ्यावी असे आम्हाला वाटते, असे जेन्यूटाचे अध्यक्ष अजय पटनाईक यांनी म्हटले.
पतियाळा हाउस कोर्टाच्या परिसरात पत्रकार, विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्यापुरती सुनावणी मर्यादित राहील. त्याबाबत १० मार्च रोजी सुनावणी केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. केवळ
१५ फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसाचारापुरती सुनावणी सीमित असेल, असे जे. चेलमेश्वर आणि ए.एम. सप्रे या न्यायमूर्तीद्वयांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष शेहला रशीद शोरा म्हणाली की, जादवपूर विद्यापीठ आणि एएमयूने पोलिसांना विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करू दिला नव्हता; तशीच भूमिका जेएनयूच्या कुलगुरूंनी घ्यावी, अशी आमची मागणी आहे.