केजरीवालांच्या घरी शिरले पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 03:03 AM2018-02-24T03:03:52+5:302018-02-24T03:03:52+5:30
दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्यावर आम आदमी पार्टीच्या आमदारांनी केलेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची झाडाझडती घेतली.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्यावर आम आदमी पार्टीच्या आमदारांनी केलेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची झाडाझडती घेतली. घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी ते तेथे गेले होते.
संतप्त केजरीवाल यांनी त्यानंतर सवाल केला आहे की, मोठ्या संख्येने पोलीस माझ्या घरी पाठविण्यात आले. घराची झडती सुरू आहे. या चौकशीला काहीच हरकत नाही. पोलिसांनी बारकाईने तपास करावा. पण न्यायाधीश लोया यांच्या मृत्यू प्रकरणात अमित शहा यांची चौकशी कधी होणार आहे? दिल्ली सरकारचे प्रवक्ते अरुणोदय प्रकाश यांनी सांगितले की, जवळपास ६० ते ७०
पोलीस कर्मचाºयांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी प्रवेश केला. हे निवासस्थानच त्यांनी ताब्यात
घेतले. कोणतीही सूचना न
देता हे पोलीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसले. पोलीसराजने दिल्लीच्या लोकशाहीची हत्या केली आहे. ते मुख्यमंत्र्यांशी असे वागत असतील तर, गरीब लोकांबाबत ते काय करू शकतात? केजरीवाल यांच्या निवासस्थानी बैठकीच्या वेळी मुख्य सचिवांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आपचे आ. प्रकाश जारवाल व अमानतुल्ला खान यांना अटक झाली आहे.
चौकशीला काहीच हरकत नाही. पोलिसांनी बारकाईने तपास करावा. पण न्यायाधीश लोया यांच्या मृत्यू प्रकरणात अमित शहा यांची चौकशी कधी होणार आहे? - अरविंद केजरीवाल
मुख्यमंत्री केजरीवाल यांचे सल्लागार व्ही. के. जैन यांच्यावर जबाब बदण्यासाठी पोलीस दबाव आणत आहेत, असा आरोप आपने केला. आशुतोष व संजय सिंह यांनी दावा केला की, आप सरकार अस्थिर करण्याचे हे कारस्थान आहे. नायब राज्यपाल अनिल बैजल हे भाजपाचे एजंट असल्याची टीका त्यांनी केली. पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात जैन यांनी त्या घटनेच्या वेळी शौचालयात होतो व नेमके काय झाले हे आपणास माहीत नाही, असे पोलिसांना सांगितले आहे. आशुतोष म्हणाले की, मुख्य सचिवांनी आपल्यावर रात्री १२ वाजता ह्ल्ला झाल्याचा आरोप केला आहे. मात्र ते ११.३0 वाजता मुख्यमंत्र्यांच्या घरातून जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत, असा दावा आशुतोष यांनी केला.
सनदी अधिकारी पीएमओमध्ये
मुख्य सचिवांवरील हल्ल्यानंतर दिल्ली सरकारमधील सनदी अधिकाºयांचे शिष्टमंडळ शुक्रवारी पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना भेटले आणि आपल्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जितेंद्र सिंह म्हणाले की, हे अधिकारी कार्मिक मंत्रालयासमोर आपल्या तक्रारी नोंदवू इच्छित होते. कार्मिक मंत्रालय हे भारतीय प्रशासकीय सेवेवर नियंत्रण ठेवते.