‘भारत बंद’दरम्यान पोलिसांचा लाठीमार, आरक्षणातील उपश्रेणीच्या निर्णयास विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 06:11 AM2024-08-22T06:11:41+5:302024-08-22T06:12:13+5:30
झारखंडमध्ये रांचीत बंद समर्थकांनी माेठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून ‘रास्ता राेकाे’ केला.
- एस. पी. सिन्हा
पाटणा/नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि जमातींसाठी लागू असलेल्या आरक्षणात क्रिमिलेअर आणि उपश्रेणीच्या आधारे ठराविक आरक्षण लागू करण्यास परवानगी देणाऱ्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध बुधवारी अनुसूचित जाती-जमाती संघर्ष माेर्चा, नॅशनल काॅन्फेडरेशन ऑफ दलित ॲण्ड आदिवासी ऑर्गनायझेशनसह विविध संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला ठिकठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला.
या बंदचा प्रभाव बिहारमध्ये अधिक हाेता. उत्तर प्रदेशात बहुतांश भागात दैनंदिन जीवन सुरळीत राहिले, तर गुजरातमध्ये मागासवर्गीय आणि आदिवासीबहुल भागांत या बंदचा परिणाम दिसून आला. झारखंडमध्ये रांचीत बंद समर्थकांनी माेठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून ‘रास्ता राेकाे’ केला.
भारत बंद का?
घटनापीठाने गेल्या १ ऑगस्ट राेजी राज्यांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी असलेल्या आरक्षणात उपश्रेणी निर्माण करण्याची परवानगी दिली हाेती.
शासकीय नाेकऱ्यांसह विविध प्रवेशप्रक्रियांसाठी असे वर्गीकरण करण्याचा राज्यांना अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले हाेते. अशा वर्गीकरणाला या दाेन्ही वर्गांतून विराेध हाेत असून, त्या विराेधात हा भारत बंद पुकारण्यात आला आहे.
देशभरात काय घडले?
- बिहारमध्ये ट्रेन रोखली.
- पाटण्यामध्ये लाठीमार.
- राजस्थानमध्ये शाळा बंद.
- देशाच्या उत्तर भागातील अनेक महामार्ग आंदोलकांनी अडविले.
- बिहारमध्ये शाळेची बस जाळण्याचा प्रयत्न, आतमध्ये होती २० मुले.