पोलीस हत्याकांड : आणखी ३ पोलीस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 04:16 AM2020-07-07T04:16:49+5:302020-07-07T04:17:30+5:30
विकास दुबेच्या गुंडांनी गेल्या आठवड्यात कानपूरजवळच्या बिकरू खेड्यात आठ पोलिसांना ठार मारले होते. त्या हत्याकांडानंतर दुबे बेपत्ता असून, त्याची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी एक लाखाचे बक्षीस २.५ लाख रुपये केले आहे.
कानपूर/लखनौ : कुख्यात गुंड विकास दुबे याला नियोजित कारवाईची माहिती दिल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी तीन पोलिसांना निलंबित केले आहे. विकास दुबेच्या गुंडांनी गेल्या आठवड्यात कानपूरजवळच्या बिकरू खेड्यात आठ पोलिसांना ठार मारले होते. त्या हत्याकांडानंतर दुबे बेपत्ता असून, त्याची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी एक लाखाचे बक्षीस २.५ लाख रुपये केले आहे.
उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक एच. सी. अवस्थी म्हणाले, ‘‘आम्हाला मिळालेल्या माहितीवरून दुबेला शोधण्यात येत आहे. पोलिसांनी या आधी चौबेपूर पोलीस ठाण्याचा अधिकारी विनय तिवारी याला निलंबित केले. दुबे याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ६० गुन्हे दाखल आहेत.’’ तीन जुलैच्या रात्री दुबेच्या टोळीतील लोकांनी गनिमी काव्याने हल्ला करून आठ पोलिसांना ठार मारले व सात जणांना जखमी केले. नियोजित धाडीची माहिती दुबेपर्यंत पोहोचवली असण्याच्या संशयावरून तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यात उपनिरीक्षक कुंवरपाल आणि कृष्णकुमार शर्मा आणि कॉन्स्टेबल राजीव यांचा समावेश आहे. या तिघांविरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.
राजकीय नेत्यांशी संबंधांचा विकास दुबेने केला दावा
लखनौ : कुख्यात गुंड विकास दुबे याने तारीख उपलब्ध नसलेल्या एका व्हिडिओ मुलाखतीत माझे राजकीय गुरू हे उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष हरी शंकर श्रीवास्तव हे असून त्यांनीच मला राजकारणात पुढे केले, असे म्हटले. श्रीवास्तव हे राज्यात १९९०-१९९१ मध्ये मुलायमसिंह यादव यांचे सरकार असताना सभागृहाचे अध्यक्ष होते.
व्हिडिओत दुबे याने म्हटले की, ‘माझा गुन्हे आणि गुन्हेगारांशी काहीही संबंध नाही. माझ्याविरुद्ध दाखल झालेले गुन्हे हे माझी लोकप्रियता माझ्या विरोधकांना सहन न झाल्याचा परिणाम आहे.’ स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) आणखी एक व्हिडिओ मिळवला असून त्यात दुबे हा भाजपचे आमदार अभिजित सांगा आणि भगवती सागर यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल बोलताना दिसला. अभिजित सांगा आणि भगवती सागर यांनी मला २०१७ मध्ये माझ्यावर पोलीस कारवाई होत असताना मदत केली होती, असे तो म्हणाला. दुबे याचे हे म्हणणे सांगा यांंनी स्पष्टपणे फेटाळून लावले.