पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणारा काश्मीरमधील पोलीस अधिकारी निलंबित
By admin | Published: October 14, 2016 08:18 AM2016-10-14T08:18:00+5:302016-10-14T10:06:10+5:30
पाकिस्तानी गुप्तचर विभागातील अधिका-यांना जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेविषयी गुप्त व संवेदनशील माहिती पुरवणा-या पोलिस अधिका-याला निलंबित करण्यात आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १४ - पाकिस्तानी गुप्तचर विभागातील अधिका-यांना जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेविषयी गुप्त व संवेदनशील माहिती पुरवणा-या पोलीस अधिका-याला निलंबित करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून काश्मीर खो-यात तणावाचे वातावरण असतानाच डीएसपी(पोलीस उपअधीक्षक) तन्वीर अहमद यांच्यावर पाकिस्तानी एजंट्सना गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी (पोलीस महासंचालक) के. राजेंद्र कुमार यांना या गोष्टीचा संशय येताच त्यांनी तन्वीर अहमद यांच्यावर पाळत ठेवली व अखेर पुरेसे पुरावे हाती आल्यानंतर गुरूवारी अहमद यांना निलंबित करण्यात आले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तन्वीर अहमद गेल्या काही काळापासून टेलिफोनच्या माध्यमातून सतत सीमावर्ती भागातील पाकिस्तानी एजंट्सच्या संपर्कात असल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून डीजीपींना मिळाली होती.
आरोपी तन्वीर अहमद यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ' सुमारे महिन्याभरापूर्वी मला कंट्रोल रूममध्ये एक फोन आला. समोरील व्यक्तीने आपण सैन्यातील कमांडर असल्याचे सांगिंतले व काश्मीर खो-यात तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा दलातील जवानांची माहिती मागितली. मात्र त्याला ती माहिती देण्यापूर्वी आपण वरिष्ठ अधिका-यांकडून (एसपी) परवानगी घेतली होती' असे स्पष्टीकरण तन्वीर यांनी दिले.
पण तन्वीर यांनी व्हॉट्सअॅपद्वारे सुरक्षा रक्षकांची माहिती दिली, गृहमंत्रालयातील अधिका-यांना याचा सुगावा लागताच त्यांनी ताबडतोब तन्वीर यांचे सर्व फोन कॉल रेकॉर्ड करून तपास सुरू केला. तसेच पोलीस महासंचालक के. राजेंद्र कुमार यांनाही सावध केले. त्यानंतर राजेंद्र कुमार यांनी किमान १५ दिवस अाधी तन्वीर यांच्यावर बारकाईने नजर ठेवली.
काश्मीर खो-यात तैनात असलेल्या पोलिसांना गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातून असे फोन येत असतात. आपण सुरक्षा एजन्सीचे अधिकारी असल्याची बतावणी करून ते संबंधित अधिका-यांकडून सुरक्षा दलांच्या तैनातीची माहिती मागतात, असे गुप्तचर सूत्रांनी सांगितले. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लष्करातील अधिकारी त्यांना माहिती देणं टाळतात.